नाशिक : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यात असून काल नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे गावात भेट दिली. यावेळी त्यांनी येथील एकलव्य आदिवासी वस्तीत जेवणाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी देखील तव्यावर भाजल्या आहेत. यानंतर वस्तीतील ग्रामस्थांसोबत अस्सल गावरान जेवणाचा आस्वादही घेतला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे (Shravan) औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. दोन दिवसांपासून हा दौरा सुरु असून पहिला दिवस छत्रपती संभाजीनगर येथून सुरू होऊन नाशिक जिल्ह्यात आला. यात येवला, निफाड, पिंपळगाव, सप्तशृंगी गड, त्यानंतर नाशिकला मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) जाऊन पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी त्यांनी सिन्नर (Sinner) तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे भेट दिली. येथील गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आदिवासी वस्तीत जाऊन कुटुंबासोबत चुलीवरील जेवणाचा आस्वाद घेतला.
शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्ताने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे (Nandur Shingote) येथे आलेल्या पंकजा मुंडे यांनी एकलव्यनगर ठाकर आदिवासी पाड्यास भेट दिली. येथे स्वागत झाल्यानंतर त्यांनी एका घरात जाऊन भाकरी थापत चुलीवरील भोजनाचाही आस्वाद घेतला. देवराम आगिवले या आदिवासी कुटुंबाकडे जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी थापल्या. मुंडे यांच्यासाठी स्वयंपाक बनवणाऱ्या मथुराबाई आगिवले, जयश्री आगिवले, सुलाबाई पथवे, गीता आगिवले यांनी ठाकर समाजातील शेंगदाण्याची चपाती मुंडे यांना बनवून दाखवली. यावेळी घरातील महिलांशी गुजगोष्टी केल्या. त्यांनी थेट चुलीसमोरच बैठक मारत हाताने पीठ मळून त्यांनी काही वेळेतच भाकरी थापली. चुलीवर तापलेल्या तव्यावर त्यांनी भाकरी टाकत पाण्याचा शिपकाही मारला. त्यांनंतर भाकरी पिठले, कुळथाचे शेंगोळे, मटकी, ठेचा, झिरके, शेंगदाण्याची पोळी अशा भोजनाचा आस्वाद घेतला.
मी कुणाला डरणारी नाही...
यावेळी त्या म्हणाल्या की, दोन महिने सुटीवर होते. आपल्या मागे अडचणी, कारखाने अन् रोज नोटिसा. त्यामुळे अनेक अनेक अडचणी असल्याचे सांगत मनातील खदखद बोलून दाखवली. संवाद साधण्यापूर्वी मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारक, बुद्धविहाराला भेट दिली. 2019 ला शिवशक्ती परिक्रमा काढण्याचे ठरवले होते. आता 2014 ला विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले, गोपीनाथ मुंडे यांच्या वाट्याला जनतेचे प्रेम आले. आपल्या वाट्याला शक्ती आली. त्यामुळेच मी कुणाला डरणारी नाही, अशी गर्जना पंकजा मुंडे यांनी केली. स्वाभिमानाने राहू, स्वाभिमानाने जगू असे सांगून अविचाराने निर्णय घेणार नसल्याचेही सांगितले. मुंडे यांनी संपूर्ण भाषणात कुणाचेही नाव न घेता आपला रोख दाखवला.
इतर महत्वाची बातमी :