नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) हजारो जवान सीमेवर तैनात असून देशाची सेवा बजावत आहेत. मात्र हीच सेवा बजावताना अनेकांना आपल्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येत आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे, तर काही जवानांचे सुट्टीवर असताना अपघाती (Accident) निधन झाले आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील जवानांचे सुट्टीवर आले असताना अपघाती निधन (Jawan Martyred) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) जवानांचे गेल्या काही वर्षांत अपघाती निधन झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जुलै महिन्यात निफाड (Niphad) तालुक्यातीलच धानोरे येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर यांचा शिर्डी (Shirdi) येथून दुचाकीवरुन परत येत असतांना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ते शिर्डी येथून साईबाबाचे दर्शन करुन आपल्या नातेवाईकांकडे जात असतांना ही घटना घडली होती. श्रीराम यांच्यासोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे यालाही जबर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तालुक्यातील दुसऱ्या जवानांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील रहिवासी असलेले भारतीय लष्कराचे जवान योगेश सुकदेव शिंदे (Yogesh Sukdev Shinde) यांचे शुक्रवारी सायंकाळी अपघाती दुःखद निधन झाले. जवान शिंदे हे काही दिवसांपूर्वीच सुट्टीनिमित्त गावी आले होते. सुट्टीवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे नातेवाईकांना, मित्रांच्या भेटी गाठी घेत असत. जवान योगेश शिंदे हे पोळ्याच्या (Pola) सणानिमित घरी आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासोबत पोळ्याचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार रोजी ते काही कामानिमित्त मोटारसायकल वरून तालुक्यातीलच वनसगाव रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात जवान योगेश शिंदे हे गंभीर जखमी झाले, रक्तश्राव अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


कुटुंबावर दुःखाचा डोंगर 


जवान योगेश शिंदे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करत होते. याचबरोबर कुटुंबांची देखभाल देखील करत होते. पोळा साजरा केल्यानंतर ते दुचाकीवरून घरी येत असताना पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. जवान योगेश शिंदे यांच्या अपघाती निधनाने शिंदे कुटुंबावर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता. तसेच आज शनिवार रोजी जवान योगेश शिंदे यांच्यावर खडक माळेगाव येथे आणल्यानंतर चार वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.