नाशिक : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (LCB) सातत्याने कारवाई सुरू असून आता दोन दिवसांत तीन कारवायांत चार लाचखोरांना (Bribe) ताब्यात घेण्यात आले आहे. 40 हजारांची लाच घेणाऱ्या राज्य कर अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. त्यानंतर अभोणा पोलीस ठाण्यातील एपीआयसह पोलीस शिपायास 10 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मोटर वाहन निरीक्षकाने खासगी इसमाच्या माध्यमातून तीनशे रुपयांची लाच स्वीकारली, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत आहेत, मात्र यात तसूभरही कमी झालेली दिसून येत नाही. उलट लाचखोरांच्या (ACB) अंख्येत वाढ होत आहे. अशातच नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांत चार लाचखोरांना ताब्यात घेतले आहे. यात पहिली कारवाई जीएसटी अधिकाऱ्यांवर करण्यात आली आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असून जीएसटी (GST) भरणे बाकी होते. जगदीश पाटील याने तक्रारदाराकडे जाहिरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी चित्रीकरणाची वाहने जीएसटी दंड न भरता सोडून देतो, असे सांगत 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराकडून 40 हजारांची लाच स्वीकारताना पाटील यास पथकाने अटक केली. पथकाने पाथर्डी फाटा येथील वस्तू आणि सेवाकर कार्यालयात ही कारवाई केली.


दुसऱ्या घटनेत कळवण (Kalwan) तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यातील एपीआयसह शिपायास लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस ठाण्यातच 10 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यातील शिपाई कुमार गोविंद जाधव यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) नितीन जगन्नाथ शिंदे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार अभोणा पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडीअंती 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कम जाधवकडे देण्यास सांगितली होती. जाधवने गोपनीय कक्षात कागदावर दहा हजारांचा आकडा लिहून फिर्यादीकडे पैशांची मागणी केली आहे.


मोटर वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात 


तर तिसऱ्या घटनेत पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरी आरटीओ (RTO Officer) तपासणी नाक्यावर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्या ठिकाणी मोटर वाहन निरीक्षक संशयित निलोबा जोतिबा तांदळे यांच्या निर्देशाने खासगी इसम सुनील सदाशिव भोईर यास तीनशे रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. दोघांविरोधातला तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या वसई प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतील दापचेरी आरटीओ तपासणी नाका हा नेहमी चर्चेत राहिला आहे आणि याच ठिकाणी एसीबी पथकाने सापळा रचून मोटर वाहन निरीक्षकाच्या माध्यमातून आलेल्या संशयितास लाच घेताना अटक केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Crime : जनतेचे सेवक ना? मग लाच घेताना लाज कशी वाटत नाही, हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर?