नाशिक : आज नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर आज नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात पहाटे प्रभू श्रीराम, लक्ष्मण , सीता यांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आले. दिवाळीतील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. तिन्ही मूर्तींना सुवासिक तेल उटणे लावून स्नान घालण्यात आले. यावेळी मंदिर भाविक भक्तांनी फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. 


आज लक्ष्मीपूजन तसेच नरक चतुर्दशी एकाच दिवशी आल्याने देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पहाटे पाच वाजेच्या काकड आरतीनंतर सहा वाजता देवांच्या मूर्तींना तेल उटण लावत अभ्यंगस्नान घालण्यात आले. पुरुषसूक्तचे 16 आवर्तन आणि श्रीसूक्तचे एक आवर्तन करून महापुजा संपन्न होताच नवीन वस्त्र आणि पारंपारिक अभुषण चढवण्यात आले. मंदिरातील पुजाऱ्यांच्या वतीने तिन्ही मूर्तींवर अभिषेक करण्यात आला. पहाटे झालेल्या या सोहळ्याने मंदिर परिसरातील संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले. आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी दारे खुले करण्यात आले. प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव अशीच प्रार्थना भाविकांकडून करण्यात येते आहे. 


दिवाळीच्या सणाचा उत्साह देशभरात सुरु आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दीपोत्सवाचा हा सण लक्ष्मीला समर्पित असल्याने लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस असल्याचे मानले जाते. आज नरक चतुर्दशीच्या दिवशी सहा देवांचे पूजन केले जाते. या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला असल्याची अख्यायिका सांगितली जाते. याच पार्श्वभूमीवर नरकचतुर्दशी साजरी केली जात आहे. दुसरीकडे आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात करण्यात आली. त्याचबरोबर मंदिरातील राम-सीता, लक्ष्मणाला अभ्यंगस्नान घालण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. 


नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त मिठाईची मागणी वाढली! 


खरं तर दिवाळी म्हंटल की फराळाच्या पदार्थांसोबतच मिठाईला मोठी मागणी नागरिकांकडून होत असते. घरात गोड गोड मिठाई आणत दीपोत्सवाच्या आनंदात आणखीणच भर पाडली जाते आणि यामुळेच मिठाई व्यावसायिकांनी देखिल यंदा अनेक नवनविन मिठाई तयार करण्यासोबतच गिफ्ट म्हणून देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमध्येही मिठाई उपलब्ध करून दिली आहे. आज लक्ष्मीपूजन तसेच नरक चतुर्दशी देखिल असल्याने अगदी सकाळपासूनच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळत असून यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्के मागणी वाढल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : फुलांचा बाजार सजला, लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांचा दर वाढला, नाशिककरांची खरेदीसाठी गर्दी