ABP Majha Exclusive : सध्या इस्त्राईल आणि हमासमध्ये युद्ध (Israel-Hamas War) सुरु आहे. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून (Suez Canal and Red Sea) होणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे भारतातून युरोपियन देशात होणारी द्राक्ष निर्यात (Grape export) जहाज वाहतूक कंपन्यांनी थांबवली असून राज्यातील द्राक्ष निर्यातीला सध्या ब्रेक लागला आहे. भारत सरकार या परिस्थितीवर ठोस पावलं उचलणार का? याकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
'भारताची द्राक्ष राजधानी' म्हणून नाशिकची ओळख आहे. परदेशी नागरिकही नाशिकच्या द्राक्षांच्या प्रेमात आहेत. जगातील सर्वात स्वस्त आणि उच्च दर्जाचे द्राक्ष म्हणूनही भारताचे द्राक्ष ओळखले जातात. युरोप देश हा पूर्णतः आपल्या द्राक्षांवरच अवलंबून असतो. चिली आणि साऊथ आफ्रिका हे तिथे आपले मुख्य स्पर्धक असतात मात्र त्यांना मागे टाकत त्या बाजारपेठेवर भारतीय द्राक्षांनी कबजा मिळवला आहे.
इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर
युरोपियन देशात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तिन महिन्याचा द्राक्षांचा मुख्य हंगाम असतो, मात्र हा हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच भारतातून युरोप देशात होणारी द्राक्षांची निर्यात ठप्प झाली आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे इस्त्राईल आणि हमासमध्ये सुरु असलेलं युद्ध. या युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर कसा परिणाम होतोय याबाबत नाशिकचे द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे (Rajaram Sangle) यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
राजाराम सांगळे म्हणाले की, लाल समुद्रामधून सुएझ कालव्याला जोडण्यासाठी गाझापट्टी हा मार्ग सर्वात सोईस्कर आहे. त्यामुळे त्या मार्गाला अतिशय महत्व आहे. म्हणूनच अतिरेक्यांनी तिथे हल्ले केले. परिणामी मोठमोठ्या जहाजांच्या कंपन्यांनी त्या भागातून प्रवास करणे बंद केले. कारण या जहाजांच्या किमती हजारो कोटींमध्ये आहेत. एका जहाजावर सुमारे 4 ते 8 हजार कंटेनर्स असतात. त्यामुळे सर्व कंपन्यांनी घोषणा केली की, आम्ही आता लाल समुद्रातून प्रवास करणार नाही. यावर दुसरा मार्ग म्हणजे संपूर्ण आफ्रिकेला वळसा घालून युरोपला जावे लागते.
द्राक्ष खराब होण्याची भीती
सुएझ कालव्यामार्गे युरोप देशात जाण्यासाठी सुमारे नऊ हजार किलोमीटरचे अंतर पार करण्यास सुमारे 21 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आफ्रिकेकडून प्रवास करताना सुमारे 19 हजार किमीचा पल्ला गाठावा लागतो. त्यासाठी किमान 34 ते 38 दिवस लागतात. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जहाज कंपन्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक कंपन्यांनी थांबवली असून परिणामी भारतातून युरोपियन देशात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसणार असून द्राक्षदेखील खराब होण्याची भीती आहे.
10 ते 15 टक्केच निर्यात
नाशिकचा द्राक्षाचा हंगाम हा 15 जानेवारीपासून सुरु होतो. मात्र अद्याप कुठेच हालचाल नाही. एकट्या महाराष्ट्रातूनच आठवड्याला 400 ते 500 कंटेनर युरोपियन देशात जातात. तर सिझनमध्ये 8 ते 10 हजार कंटेनर जातात. या युद्धामुळे सध्या केवळ 10 ते 15 टक्केच निर्यात होत आहे.
वाहतूक पूर्वपदावर कधी येणार?
एकंदरीतच सरकारकडून याबाबत काही पाऊलं उचलतात का? याकडेच निर्यातदारांचे लक्ष लागलेलं असतानाच दुसरीकडे या सर्व परिस्थितीवर तोडगा काढत पाऊलं उचलण्यास केंद्र सरकरने सुरुवात केली आहे. अरबी समुद्र आणि लाल समुद्रातून जी जहाजे जातील त्याला सुरक्षा दिली जाईल असं सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतंच स्पष्ट करत हल्ले परतवले जातील, असा इशारादेखील अतिरेकी संघटनांना दिला आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाहतूक पूर्वपदावर नक्की कधी येणार? आणि युरोपियन देशात द्राक्ष निर्यात सुरू होऊन दिलासा कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांसह द्राक्ष निर्यातदारांचे लक्ष लागलेले आहे.
आणखी वाचा