Nashik Godavari : 2027 साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची (Kumbh Mela 2027) चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराला हजारो कोटी रुपयांचा निधी मिळणार असून शहराचा विकास होणार आहे. याच विकासकामादरम्यान गोदापात्रातील (Godavari River) सिमेंट काँक्रिटीकरणाचा (Cement Concretization) मुद्दा ऐरणीवर आला आहे. रामकुंडातील (Ram Kund) सिमेंट काँक्रिट काढून टाकावे, अशी मागणी पुन्हा एकदा पर्यावरण प्रेमी करत आहेत तर पुरोहित संघाकडून (Purohit Sangh) पर्यावरणप्रेमींच्या मागणीला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काँक्रिटीकरण काढायचे की नाही? या पेचात प्रशासन पडले आहे. 


पर्यावरण प्रेमींची मागणी


प्रयागराजचा कुंभमेळा पूर्णत्वास येत असतानाच नाशिकमध्ये सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभेमेळ्याचे वेध प्रशासनाला लागले असून  कुंभमेळ्याच्या नियोजन बैठका आणि पाहणी दौऱ्यांना सुरवात झाली आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान ज्या पवित्र रामकुंडात शाहीस्नान केले जाते त्याच रामकुंडातील सिमेंट काँक्रिटचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गोदा पात्रात सिमेंट काँक्रीटचा थर टाकून कुंड एकसारखे करण्यात आले आहे. मात्र, यामुळे गोदापात्रातील  जिवंत झरे बुझविण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. गोदावरी सध्या गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर अवलंबून आहे.  त्यामुळे गोदावरीला स्वावलंबी बनवण्यासाठी रामकुंडातील सिमेंट काँक्रिटीकरण काढून टाकावे आणि गोदा पात्रातील जिवंत झरे पुनुरुज्जीवित करावे, त्यामुळे गोदारीचे पदूषण कमी होईल आणि नदी पहिल्यासारखी प्रवाहित होईल, असा दावा  पर्यावरण प्रेमी करत आहेत.


पुरोहित संघाचा विरोध 


अरूणा, वरुणा आणि गोदावरी या तिन्ही नद्यांचा संगम रामकुंडात होत असल्याने या स्थानाला अनन्य साधारण महत्व आहे. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत थेंब रामकुंडात पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे ही रामकुंडाचे धार्मिक महत्व आहे. याच कारणामुळे कुंभमेळातील साधूंचे शाहीस्नान असो वर्षभर येणाऱ्या भाविकांचे गोदा स्नान याच रामकुंडात केले जाते. रामकुंडाच्या तळाला काँक्रिटीकरण करण्यात आल्यानं भक्तांना त्याचा आधार मिळतो.काँक्रिटीकरण जर काढून टाकले तर टोकदार दगड, काचांचे तुकडे किंवा इतर काही कारणामुळे भाविक जखमी होण्याची आणि अपघात घडण्याची भीती पुरोहित संघाने व्यक्त केली आहे. रामकुंडात सिमेंट काँक्रिटीकरण काढण्यास विरोध केला आहे. रामकुंडातील सिमेंट काँक्रिट काढणे आणि त्याला होणारा विरोध या दोन्ही बाजू प्रशासन समोर आल्यात. सिमेंट काँक्रिट काढल्याची उपयुक्तता किती आहे. काँक्रिट काढले आणि नदी पुनरुज्जीवित झाली नाही तर काय? भाविकांच्या धार्मिक भावनांचा मुद्दा असल्यानं प्रशासन ही सबुरीने घेत असून साधू, महंत, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक अशा सर्वांशी चर्चा करूनच पूर्ण अभ्यासाअंती निर्णय घेणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  


प्रशासनाची डोकेदुखी वाढली


एकूणच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच नेत्याचे दौरे देखील नाशिकमध्ये वाढले आहेत. पुढील  काही महिन्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या निमिताने नाशिक शहराला भरघोस निधी मिळणार असून मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असल्यानं महापालिकेवर झेंडा फडविण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहे. मात्र, दरम्यानच या काळात नियोजन बैठका आणि उद्भवणारे वाद टाळता टाळता  प्रशासनाच्या नाकी नऊ येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 



आणखी वाचा 


Nashik Politics : महायुतीत श्रेयवादाची लढाई; अजितदादांनी भूमिपूजन केलेल्या कामाचं एकनाथभाईंकडून पुन्हा भूमिपूजन? नेमकं काय घडलं?