Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात, आमदार फरांदेंच्या हातात नाशिक ढोल, पालकमंत्र्यांचा हटके डान्स
मानाच्या पाच गणपतीसह 21 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 67 cctv, 4 ड्रोन, आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे.
Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असून सकाळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरवात झाली. दरम्यान सकाळपासुन नाशिककरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावर पाय ठेवायला जागा नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मिरवणूक भद्रकाली परिसरात असताना अचानक दोन तरुणांची (Youth Fight) हाणामारी झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या या दोघांमध्ये तुफान राडा झाला. काही वेळात एकमेकांची डोकीही फोडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. यात एकजण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
Nashik Ganesh Visarjan : आज गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी असल्याने लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय. नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील वाकडी बारव येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक ढोल वाजवत आनंद लुटला. तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाच्या वाद्यांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची सुरवात झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी गणेश मंडळांना केले.
Nandurbar Ganesh Visarjan : नंदुरबार शहरात गणेश विसर्जन मिरवणूक यांची धूम पाहण्यास मिळत आहे मानाच्या पहिल्या दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ हिना गावित ह्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मानाच्या दादा गणपती समोर शहरातील तरुणी लेझीम नृत्यामध्ये खासदार हिना गावित ही सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वाद्याच्या तालावर खासदार हिना गावित यांनी लेझीम नृत्याचा आनंद घेत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणींचा आनंद दुगाणित केला.
Nashik Ganesh Visarjan : गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या दहा दिवसातील सात दिवस नाशिककरांनी गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळच्या सुमारास नाशिककरांनी मोठ्या संख्येने गणेश देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरु असल्याने नाशिककरांच्या आनंदावर जणू विरजण पडले होते. गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या सुमारास ऊन तर दुपारच्या सुमारास पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे आजही सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असून आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा महत्वाचा दिवस असल्याने आजही पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा कमालीचा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच सार्वजनिक मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशातच अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. नवव्या दिवशीच्या गणपती बाप्पाला निरोप देताना जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील एक युवक पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. शिरवाडे वणीगावाजवळील पाचोरे वणी येथील नेत्रावती नदी काल सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच चांदोरी व पिंपळगाव अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेतला जात होता, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने युवकाचा शोध लागला नाही.
पार्श्वभूमी
नाशिक : नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वजाता सुरू होणार, पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते पूजा करून वाकडी बारव पासून मिरवणूक सुरू होणार आहे. मानाच्या पाच गणपतीसह 21 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 67 cctv, 4 ड्रोन, आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे. गुलालावडी व्यायाम शाळेचे लेझीम पथक, इतर मंडळाचे ढोल पथक मिरवणुकीच्या आनंदात भर घालणार आहे. शिवसेवा युवक मंडळाची मिरवणूक खास आकर्षण रहाणार, दक्षिण भारतातील कलाकार देवांची वेशभूषा धारण करून आपली अदाकारी साकारणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून घरगुती गणेश विसर्जनाला सुरवात होणार आहे. शहराच्या सहा ही विभागात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 27 नैसर्गिक आणि 57 कृत्रिम तलावात विसर्जन केले जाणार, अधिकाधिक मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून उद्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. नाशिकमध्ये (Nashik) देखील उद्या सकाळी अकरा वाजेपासून मुख्य मिरवणुकीला सुरवात होणार असून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तासह यंदा तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) मिरवणूक मार्गावर पाळत ठेवणार आहेत. त्याचबरोबर चार ड्रोनद्वारे अवकाशातून नाशिक गणेश मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे. यासह प्रत्येक मंडळांसोबत एक वरिष्ठ अधिकारी व पथक नेमण्यात आले असून हे पथक मंडळांच्या वेळेसंदर्भात नोंदी घेणार आहे. त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकाराला आळा बसणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक (Nashik Ganesh Visarjan) अवघ्या काही तासांवर आली असून नाशिकमध्ये सकाळी अकरा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील वाकडी बारव येथून सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयाने बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे. तसेच रेंगाळणाऱ्या मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या सुरुवातीपासून 'ड्रोन शूटिंग' करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी केलेल्या चुका, इतर पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यात पोलिसांचे निरीक्षणही कागदोपत्री मांडण्यात येतील. यासह एखाद्या मंडळाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यावरील कारवाईचा निर्णयही घेण्यात येणार आहे.
असा आहे मिरवणूक मार्ग
दरम्यान पारंपरीक मिरवणूक मार्गावरील वाकडी बारव, चौकमंडई, जहांगिर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुरामपुरीयारोड, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण अशी निघणार आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -