Maharashtra Weater Alert: राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान असून थंडी गायब झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत असून अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढला आहे. परिणामी भारतीय हवामान विभागानं राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बुधवारी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होता. आता आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही तडाखा दिला असून येत्या 24 तासांत कमी दाबाचा पट्टा कमकूवत होणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय.
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
आज दि.5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार असून पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. मध्य महाराष्ट्रात आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बं उपसागरातून 'फिंजल' चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्वे दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला गेल्यानं व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.
तापमानात वाढ, ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले
तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा काहीसा वाढला आहे. किनारपट्टी भागात दमटपणा वाढला असून उकाडा जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी पडलेला गारठा गायब झालाय. किमान तापमानात वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढ पहायला मिळाली. दरम्यान, शेतकऱ्यांना आता आपल्या शेतमालाची काळजी वाटू लागली आहे. अनेकांनी शेतमाल विकण्यास काढला असून वातावरण बदलाने रब्बी पिकांवार किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी धास्तावला आहे.