Pushpa 2 Premiere Stampede: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) आज जगभरात प्रदर्शित झाला. पण, त्यापूर्वीच चित्रपटाला गालबोट लागलं आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. ठरल्याप्रमाणे पुष्पा स्टारर अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. गर्दी प्रचंड होती. हजारो चाहते चित्रपट नाहीतर अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी जमले होते. पण, तिथे प्रचंड धक्काबुक्की झाली, चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटनेचे अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 




Allu Arjun ची मोस्ट अवेटेड मूव्ही Pushpa 2: The Rule आज जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज केली जाणार आहे. पण, रिलीजच्या एक दिवस अगोदर हैदराबादच्या प्रीमियर शोमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे रिलीजचा आनंदावर काहीसं विरझण पडलं आहे. या दुर्घटनेत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या मुलाची प्रकृती गंभीर आहे, तो मृत महिलेचा लहान मुलगा असल्याची माहिती मिळत आहे. 




पती आणि मुलांसह फिल्म पाहण्यासाठी आलेली महिला 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलसुखनगर राहणारी रेवती पुष्पा 2 चा प्रीमियर शो पाहण्यासाठी पोहोचली होती, त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तिचा मृत्यू झाला. मृत महिला पती भास्कर आणि दोन मुलांसह चित्रपटाच्या प्रीमियरला गेली होती. रात्री 10.30 च्या सुमारास गोंधळ उडाला, जेव्हा स्क्रिनिंगला उपस्थित असलेला चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यावेळी तिथे प्रचंड चेंगराचेंगरी झाली. 


मदतीला लोक धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला 


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलीस आणि आसपासचे लोक पीडितेच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. रेवतीला रुग्णालयात नेण्यापूर्वी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे, तर रेवतीचा जागीच मृत्यू झाला.


अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी झुंबड 


इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अल्लू अर्जुनच्या येण्याची माहिती मिळाली, त्यावेळी जमलेली गर्दी अनियंत्रित झाली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्या जवळ जाण्यासाठी लोकांनी हाणामारीही सुरू केली. त्यावेळी पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला. काही वेळातच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात अल्लू अर्जुन तिथून निघून गेला. 


'हा' चित्रपट 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा'चा सिक्वेल 


सुकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज'चा 'पुष्पा 2: द रुल' सिक्वेल आहे. हा चित्रपट 10 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पोस्ट-प्रॉडक्शन विलंबामुळे 3D आवृत्तीचं प्रकाशन शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आलं. यात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहद फासिलसह अनेक स्टार्स आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'या' 3 दिग्गजांनी नाकारल्यानंतर अल्लू अर्जुन, रश्मिकाच्या पदरात पडलं सुपरडुपर हिट 'पुष्पा'चं दान; नकार देणारे 'ते' तिघे कोण?