Nashik News : कंपनीच्या आवारात खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रागिणी मनोजकुमार वनवासी (रा. सुपरनेल इंडस्ट्रिअल, ग्लॅस्को बसस्टँडसमोर, एमआयडीसी अंबड) असे मृत बालिकेचे नाव आहे. शनिवारी (दि. २२) दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिक (Nashik News) शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रागिणीचे आई आणि वडील हे कुटुंबासह सुपरनेल कंपनीत वास्तव्यास असून शनिवारी तिचे आई वडील नियमित कामकाज करत होते. त्याचवेळी आंघोळीसाठी असलेल्या जागेवरील एका मोठ्या बादलीत रागिणी पाणी खेळत होती. त्याचवेळी तिचा तोल गेल्याने ती बादलीत पडली.
नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत
ती ओरडू लागली असताना तिचे नाक व तोंड बादलीत अडकल्याने तिचा श्वास गुदमरला व बादलीतील पाणी तिच्या नाका तोंडात गेले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. काही वेळाने तिच्या कुटुंबाने तिची शोधाशोध करायला सुरुवात केली. यावेळी रागिणी ही पाण्याच्या बादलीत पडल्याचे कुटुंबीयांना दिसून आले. तिला तत्काळ उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उड्डाणपुलावरून पडून युवकाचा मृत्यू
ओझर येथे उड्डाणपूलावरुन अतिवेगाने दुचाकी चालवणाऱ्या युवकाचा उड्डाणपूलावरुन खाली पडल्याने गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर गडाख कॉर्नर उड्डाणपूलावरुन विशाल विष्णू रणधीर हा आपल्या मोटारसायकलवर ओझर उड्डाणपूलावरुन 10 व्या मैलाकडे भरधाव जात असताना गडाख कॉर्नरच्या वरती त्याचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटून उड्डाणपूलावरुन दुचाकी घसरल्याने तो उड्डाणपूलावरुन खाली पडला. विशालच्या डोक्यास, कपाळावर, डाव्या खांद्यास, उजव्या हातास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. विशाल रणधीर हा जळगाव (ग्रा), ता. मालेगाव, जि. नाशिक येथील रहिवासी होता. हल्ली तो मानसदर्शन अपार्टमेंट, जानोरी रोड, ओझर येथे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहत होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या