नाशिक : पंचवटीत (Panchavati) परिसरात राहणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाने अॅसिड प्राशन करुन सोमवार (दि. 13) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पित्याने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने मुलाचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. आता पंचवटीतील गुरव आत्महत्येचे कोडं सुटणार आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत आत्माराम गुरख (49) आणि अभिषेक प्रशांत गुरव (29, दोघे रा. रामराज्य, उत्तर दरवाजा, काळाराम मंदिर, पंचवटी) यांचे सराफ बाजारात गेल्या काही वर्षांपासून ज्वेलरी दुकान आहे. यातून ते सोने-चांदी विक्री करत होते. या दरम्यान प्रशांत गुरव यांचे अनेकांशी व्यावसायिक व इतर मालमत्तसंदर्भात व्यवहार होते. यात त्यांचे मोहनशेठ सचदेव यांच्या समवेत देखील काही व्यवहार होते. 


तुम्ही माझ्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार आहात


त्यातच गुरव यांना अडचणी असल्याने ते तणावात होते. याच तणावातून त्यांनी सोमवार (दि. 13) रोजी सकाळी सहा ते साडेसात वाजेदरम्यान मोबाइलवरुन मोहनशेठ सचदेव यांना त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअप मेसेज करून 'तुम्ही माझ्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार आहात', असा मेसेज व एक फोटो पाठविला. परंतु तो मेसेज त्यांना गेला नाही. त्यानंतर गुरव यांनी काही वेळातच अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. 


वडिलांची अॅसिड पिऊन आत्महत्या, मुलाचा धक्क्याने मृत्यू


अॅसिड पोटात गेल्याने प्रशांत यांना त्रास होत होता. त्यावेळी दुसऱ्या रुममध्ये झोपलेला त्यांना मुलगा अभिषेक जागा झाला. त्याने वडिलांच्या रुमकडे धाव घेतली असता ते ओरडत असल्याचे दिसून आले. त्याने हे बघताच अभिषेकला धक्का बसून याबाबत नातलगांना माहिती दिली. याच दरम्यान अभिषेकला त्रास होऊन त्याच्या तोंडातून फेस आला व हातपाय ताणले जाऊ लागल्याने तो बेशुद्ध पडला. नातलगांनी दोघांनीही वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. 


सुसाईड नोटनुसार तपासास सुरुवात


या प्रकरणाचा पंचवटी पोलीस तपास करत असून आता गुरव आत्महत्येचे कोडं सुटणार आहे. सुसाईड नोटनुसार पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. बापाने आत्महत्या केल्याचे तर मुलाचा धक्क्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.  सुसाईड नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या संशयितांवर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोलापूर येथे गुंतवणूक केल्यानंतर त्यात वारंवार अडचणी येत असल्याने प्रशांत हे तणावात होते. गुरव आत्महत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु करत जाबजबाब नोंदवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी: नाशिकच्या द्वारका पूल अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट, मृतांचा आकडा वाढला, लोखंडी सळईंचा पुरवठादारही गोत्यात