नाशिक : शहरात डेंग्यू (Dengue) रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसून, दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या (Dada Bhuse) बैठकीनंतरही नाशकात डेंग्यूची परिस्थिती जैसे थेच असल्याची दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालयाकडे पाठविलेल्या 722 डेंग्यू संशयितांचे अहवाल टेस्टिंग किटअभावी जिल्हा रुग्णालयाकडे प्रलंबित आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी 7 हजार 478 घरांना भेटी दिल्या. त्यात अनेक ठिकाणी घरांच्या आजूबाजूला पडक्या जागेत, घरांच्या गच्चीवर, झाडांच्या बाजूला, रंगांच्या डब्यांमध्ये पाणी आढळून आले. नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत तंबी देण्यात आली असून, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागात 26 पाणीसाठ्यांवर कारवाई करण्यात आली.
दादा भुसेंनी दिल्या होत्या प्रशासनाला सूचना
काही ठिकाणी घरांच्या बाजूला साठवून ठेवलेल्या भांडे, कुंड्या यासुद्धा स्वच्छ करण्यात आल्या. 19 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती तत्काळ नष्ट करणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या निदानासाठी प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी किट, औषधे, गोळ्या व इतर आरोग्य सुविधांची कमतरता भासणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच हा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. शहरासह ग्रामीण पातळीवरही या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणाच्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, त्याबाबत अजूनही कार्यवाही झालेली नाही.
700 हून अधिक रक्तनमुने चाचण्या रखडल्या
शहरातील डेंग्यू रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून, या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर देखील केला जात आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव घातक ठरू लागल्याने केंद्रीय आरोग्य विभागाला याची दखल घ्यावी लागली. केंद्रीय पथकाने शहरातील विविध विभागांना भेटी देत पाहणी केली होती. सध्या नाशिकमध्ये डेंग्यू तपासणीचे किट अद्यापही उपलब्ध नसल्याने 700 हून अधिक रक्तनमुने चाचण्या रखडल्या आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच 200 हून अधिक डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी बैठक घेऊन तत्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी संध्याकाळपर्यंत डेंग्यू चाचणी किट उपलब्ध होण्याची माहिती आरोग्य अधिकारी दिली होती. मात्र अद्यापही किट उपलब्ध झालेले नाहीत.
आणखी वाचा