Nashik News : एक ना अनेक संशयास्पद घटनांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) शनिवारी एका महिलेने पाच दिवसांचे बाळ पळवल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एक धक्कादायक घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात उघडकीस आली आहे. रुग्णालयाच्या आवारात एका महिलेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत महिलेने स्वतःचे आयुष्य संपवलं आहे. कविता अहीवळे असे महिलेचे नाव आहे. महिलेने गळफास घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. महिलेने आत्महत्या का केली? यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत
घटनेची माहिती मिळताच पोलीस नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सरकारवाडा पोलिसांकडून महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा सुरु आहे. बाळ चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासातच नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) शनिवारी धक्कादायक घटना उघड होती. पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळी मातेच्या डोळ्यांदेखत बाळ चोरी करून पळ काढला होता. महिलेचे हे कृत्य काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन बाळाचा व महिलेचा शोध सुरु केला होता. हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले असून चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात पोलिसांनी आईच्या कुशीत पोहोचवले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल