Chhagan Bhujbal नाशिक : मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची (Maratha Reservation) लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला. हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे, नोटिफिकेशनचा मसुदा आहे. 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भुजबळांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 


छगन भुजबळ यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.  मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचा अध्यादेश दिल्यानंतर भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी छगन भुजबळ यांनी मुंबईत (Mumbai) सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.  


बैठकीच्या नियोजनासाठी सर्व कार्यक्रम रद्द


बैठकीचे नियोजन करण्यासाठी, विविध कायदेतज्ञांशी चर्चा करण्यासाठी भुजबळ यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आज नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद आणि कृषी प्रदर्शनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी आता सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.  


काय म्हणाले छगन भुजबळ?


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, मराठा समाजाचा विजय झाला असे तुम्हाला वाटते. पण मला तसे वाटत नाही. झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही. ही सूचना आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.  जे वकील असतील त्यांनी हरकती पाठवाव्यात. लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात. सरकारच्या लक्षात येईल याची दुसरी बाजू देखील आहे. 


50 टक्क्यांवर आता पाणी सोडावे लागणार


एकमेकांवर ढकलून चालणार नाही. समता परिषदेच्या माध्यमातून हरकती घेऊ. सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. ओबीसी आरक्षणामध्ये आल्याचा मराठ्यांना आनंद वाटेल. पण 17 टक्क्यांत सर्व येतील. ईडब्ल्यूएसमध्ये, ओपनमध्ये जे आरक्षण मिळत होते ते मिळणार नाहीत. 50 टक्क्यांत जे खेळत होतात ती संधी आता गेली. 50 टक्क्यांत मराठा समाज, ब्राह्मण आणि जैन समाज होता, त्यावर पाणी सोडावे लागले. ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणतात आणि बॅक डोअर एन्ट्री करतात. जात ही जन्माने येते एफिडेविटने येत नाही. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : पाठीवर थाप ते गळाभेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं!