नाशिक : कन्नड येथील चंदन तस्करांच्या (Sandalwood Smugglers) टोळीस एलसीबीने (LCB) काही दिवसांपूर्वी गजाआड केले. त्यानंतर आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चंदन चोरांकडून करण्यात आला आहे. शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील एसपींचे निवासस्थान लक्ष करुन चंदनचोरांनी थेट शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे. 


नाशिक जिल्हा पोलीसप्रमुखांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात सहा दरोडेखोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानातील चंदन चोरी करण्यासाठी आलेल्या संशयितांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांत दरोड्याच्या प्रयत्नाची फिर्याद देण्यात आली. सरकारवाडा पोलिसांत सहा अज्ञातांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


चंदन चोरीसाठी निवडले थेट पोलीस अधीक्षकांचे घर


याबाबत अधिक माहिती अशी की, 5 ऑगस्ट रोजी पहाटे 2.45 ते 3.30 या कालावधीत सहा अज्ञातांनी हातात लोखंडी रॉड, दांडके, दगडे व कटर मशिनसह पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील पोलीस वेळीच सावध झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.'एसपीं'च्या बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिक गुन्हे शोध पथकाने संशयितांचा माग सुरू केला आहे. त्यानंतर संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेत ओझरच्या गुन्ह्यात अटक केल्याचे उघड करण्यात आले. त्यानंतर एसपींच्या बंगल्यातील दरोड्याच्या प्रयत्नातील कबूली संशयितांनी दिली. तसेच सन 2022 मध्ये 25 किलो चांदी लूटण्याचा प्रकार अधीक्षकांच्या घरासमोर घडला होता. त्या गुन्ह्याची उकल अद्याप झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या घरापर्यंत पोहोचून चोरटे बिनधास्त गुन्हे करीत असल्याने पोलिसांच्याच सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.


आठवडाभरात नाशिकमध्ये पाचपेक्षा जास्त चंदन चोरीच्या घटनांची नोंद


दरम्यान, गेल्या आठवडभरात शहर आणि जिल्ह्यात चंदनचोरीचे पाचहून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्यातील केवळ ओझर येथील गुन्हा उघड झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात परभणी, सिल्लोड, जालना, भुसावळ, जळगाव आणि इतर जिल्ह्यातील चंदनतस्करांच्या चार ते पाच टोळ्या कार्यरत झाल्याचे समोर येत आहे. याआधी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यात, तसेच सेंट्रल जेलचे कारागृह अधीक्षक, आयुक्तांचे निवासस्थान व अन्य ठिकाणांहून चंदनाची चोरी झाली आहे. या विविध टोळ्यांत 30 जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आणखी वाचा


वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला, दुसऱ्या घटनेत एकाची हत्या; नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह