Nashik Crime : नाशिकची लाचखोरी थांबता थांबेना...आता निफाडचा कोतवाल लाच घेताना एसीबीच्या ताब्यात
Nashik Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी-कर्मचारी लाचखोरीला आळा बसावा यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. आता निफाडमधल्या तलाठी कार्यालयातील कोतवालाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Anti Corruption Bureau) कारवाई होत असताना लाचखोरी (Bribe) थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी-कर्मचारी लाचखोरीला आळा बसावा यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. त्यातच आता निफाड (Nifad) तालुक्यात लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. तलाठी कार्यालयातील कोतवालाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या घटनांचा आढावा घेतला असता निफाड तालुक्यात एका महिन्यात एक नायब तहसीलदार आणि कोतवाल, ग्रामसेवक आणि आज कोतवालास लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे. निफाडच्या एका गावातील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या कोतवालाने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
सातबारावरील नोंद मंजूर करु देण्यासाठी लाचेची मागणी
निफाड तालुक्यातील भरवस येथील कोतवालाला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. लक्ष्मण फकीरा वैराळ असे लाचखोर कोतवालाचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे वडिलोपार्जित जमिनीचे खाते वाटप आदेश तहसील कार्यालय, निफाड यांच्याकडून प्राप्त झाले होते. सदर आदेशाप्रमाणे सात बारा उताऱ्यावर नोंद करणे आवश्यक होते. तसेच ही नोंद मंजूर करुन देण्याकरता कोतवाल वैराळ याने अर्जदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. पहिल्या टप्प्यात तीन हजार आणि नंतर दोन हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि या सापळ्यात वैराळ हा लाच घेताना पकडले गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एसीबीद्वारे पुढील कार्यवाही सुरु आहे.
एसीबीकडून आवाहन...
दरम्यान या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नाशिकच्या अॅन्टी करप्शन ब्युरोने आवाहन केले आहे की, "त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा."
संबंधित बातमी
Nashik Crime : यात्रेत पाळणा लावण्यासाठी ग्रामसेवकाने मागितली लाच, एसीबीने शिकवला धडा