नाशिक : स्थानबद्धतेच्या कारवाईची मुदत संपल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून (Nashikroad Central Jail) बाहेर पडलेल्या सराईतासह थाटात त्याच्या चारचाकीचे सारथ्य करणाऱ्या चालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत मिरवणुकीसाठी वापरलेली महागडी एक्सयूव्ही कारही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने शरणपूर भागात बेकायदा मिरवणूक काढणाऱ्या गावगुंडांच्या उन्मादाला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दणका दिला असून, आधी मिरवणूक नंतर पोलीस ठाण्यातील तुरुंगापर्यंत धिंड असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षद सुनील पाटणकर (Harshad Patankar) (वय 25. रा. बेथलेनगर, शरणपूर रोड) व नरेश उर्फ पवन माणिक कसबे (वय 31, रा. यशराज प्राइड, ध्रुवनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वारंवार गुन्हेगारी कृत्यात सहभाग आढळून आल्याने शहर पोलिसांनी संशयित हर्षद पाटणकर याला तडीपार केले होते. 


नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका


त्यानंतरही तो गुन्हेगारी क्षेत्रात सहभागी राहिल्याने जुलै 2023 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यास एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले होते. मंगळवारी (दि. २३) स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण झाल्याने बुधवारी (दि. 24) त्याची कारागृहातून सुटका झाली. 


हर्षद पाटणकरची मोठ्या थाटामाटात मिरवणूक 


त्यावेळी संशयित हर्षद पाटणकर याला कारमध्ये बसवून संशयित नरेश उर्फ पवन माणिक कसबे याच्यासह शहरातील गुंडांनी त्याची थाटात मिरवणूक (Harshad Patankar Rally) काढली. याप्रकरणी पाटणकर व कसबे यांना अटक करण्यात आली. शरणपूर रोड (Sharanpur Road) परिसरातून बुधवारी सायंकाळी निघालेली मिरवणूक परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरून मार्गस्थ झाली. कर्णकर्कश हॉर्न वाजवून शेकडो दुचाकी जात असल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत, संशयितांचा माग काढला. पोलीस मागावर असल्याचे कळताच मुख्य संशयित पसार झाले. 


पोलिसांनी पुन्हा आवळल्या मुसक्या


सरकारवाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओनुसार संशयित पाटणकर, कसबे यांच्यासह गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तिसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे (सर्व रा. बेथेलनगर) यांच्यावर गुन्हा नोंदविला. त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने संशयितांचा माग काढला. हवालदार प्रशांत मरकड आणि मिलिंदसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांच्या ध्रुवनगर भागात मुसक्या आवळण्यात आल्या. संशयितांच्या ताब्यातून मिरवणुकीत वापरलेली कार (एमएच 15 जीएक्स 8721) हस्तगत करण्यात आली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. 


यांनी केली कारवाई


ही कारवाई आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके व युनिटचे निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीम खान पठाण, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, मिलिंदसिंग परदेशी, विशाल देवरे अंमलदार मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व चालक समाधान पवार आदींच्या पथकाने केली.



आणखी वाचा 


Nashik Crime: तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची नाशिकमध्ये रॉयल मिरवणूक, 'बॉस इज बॅक'च्या घोषणांनी शरणपूरचा परिसर दणाणला