Nashik Crime News नाशिक : शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणणे नाशिक पोलिसांपुढे (Nashik Police) मोठे आव्हान असून नुकतीच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. गुंड हर्षद पाटणकर (Harshad Patankar) याला तुरुंगातून सोडण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात त्याची रॉयल मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीची व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता पोलिसांनी हर्षद पाटणकरच्या मुसक्या आवळून त्याला पुन्हा एकदा तुरुंगात डांबले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षद पाटणकर हा एमपीडीए अंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जेरबंद होता. त्याची नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली होती. हर्षदची सुटका होताच त्याच्या समर्थकांकडून त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. शरणपूर रोड परिसरात त्याची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली.


अलिशान गाड्यांचा वापर करत नाशिकमध्ये जंगी मिरवणूक 


या मिरवणुकीत सराईत गुन्हेगार, तडीपार गुंड आणि टवाळखोरांचाही सहभाग दिसून आला होता. आलिशान गाड्यांचा वापर करत शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी  रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली होती. गुंडाच्या मिरवणुकीमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. 


पुन्हा कारागृहात रवानगी 


मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत व्हिडिओमध्ये दिसून आले होते. टवाळखोरांकडून बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या गेल्या. आता या प्रक्ररणाची नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी हर्षद पाटणकर विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हर्षद पाटणकरला पुन्हा एकदा कारागृहात पाठवले आहे. नाशिक पोलिसांनी सुमोटो कारवाई अंतर्गत या भाईला पुन्हा जेलवारीला पाठवले आहे. दरम्यान, हर्षद पाटणकर हा सराईत गुंड असून त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.



आणखी वाचा 


Nashik News: मोठी बातमी: जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जिवंत जाळले; निफाडमधील हादरवणारी घटना