Nashik Crime: नाशिकमधील बहुचर्चित गोदापार्क दारू पार्टी प्रकरणातील गायब झालेल्या दीपक दिवे याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात आढळून आला आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर त्याच्या अंगावर जखमा, गळा आवळल्याच्या खुणा तसेच पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिपकचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी गोदापार्क परिसरात मित्राची दारू पार्टी रंगल्यानंतर यातील एक जण बेपत्ता झाला होता. अखेर आठ दिवसानंतर संबंधित तरुणाचा मृतदेह गोदावरी पात्रात तरंगताना आढळून आला आहे. दीपक गोपीनाथ दिवे हा तरुण मित्रांबरोबरमध्ये पार्टीसाठी गेला असताना तो गायब झाला होता. याबाबतची तक्रार त्याच्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान आठ दिवसानंतर या तरुणाचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात मुत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान दिपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आल्यानंतर धक्कादायक अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार दिपकच्या शरीरावर जखमा असून गळा आवळल्याने व पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिपकचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आणि हा खून मित्रांनीच केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विजय जाधवची आत्महत्या...
दरम्यान पार्टीला बसलेल्या मित्रांपैकी वैजय जाधव यानेच दिपकला बोलवून घेतले होते. पार्टी दरम्यान दीपक गायब झाल्याने पोलिसांनी मित्रांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यातच रविवारी विजय जाधव यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता अचानक दीपकचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात तरंगतांना मिळून आल्याने या प्रकरणातील संशयाची सुई आता मित्रांवर गेली आहे.
एक कॉल जीवावर बेतला!
दीपक हा बायका मुलांसमवेत नाशिक शहरात राहत होता. त्या दिवशी रात्री उशिरा त्याला फोन आल्याने बाहेर जाण्यासाठी निघाला. बायकोने उशीर झाल्याचे सांगून न जाण्यास सांगितले, मात्र मित्राचा कॉल आल्याने, लगेचच परततो, असेही त्याने सांगितले. मात्र पार्टीत गेल्यानंतर तो अचानक गायब झाला आणि आज त्याचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला. त्यामुळे आता नेमकं पार्टीत काय घडलं? याद्वारे या खुनाचा उलगडा होणार आहे.
वाढती गुन्हेगारी डोकेदुखी
नाशिक शहरात क्राईम रेट वाढतच असून दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांची शहर हादरत आहे. सातत्याने गुन्ह्यांच्या घटना होत असल्याने शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.