Nashik Crime : मद्याच्या पार्टीनंतर एक मित्र गायब झाला. याबाबत गायब झालेल्या मित्राच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीसाठी पार्टीला असलेल्या इतर चार जणांना चौकशीसाठी बोलावले. पुन्हा दुसऱ्या चौकशीसाठी बोलावल्यानंतर यातील एका मित्राने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना नाशिक (Nashik) शहरात घडली आहे. 


नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत ही घटना घडली असून पोलीस ठाण्यावर नातेवाइकानी गंभीर आरोप केले आहेत. नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशन परिसरात गोदापार्क (Godapark) जवळ दोन मित्र मद्य पार्टी करत होते. यावेळी यातील विजय जाधव याने मित्र दीपक दिवे यास पार्टीसाठी बोलवून घेतले. मात्र मद्य पार्टीनंतर दीपक बेपत्ता झाला. यामुळे घरच्यांना हि बाब माहिती झाल्यानंतर त्यांनी पोलिसानी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासा दरम्यान मद्य पार्टीनंतर दीपक हा गायब झाल्याचे समोर आले. त्यानुसार मद्य पार्टीला असणाऱ्या चौघांना बोलवण्यात आले. 


दरम्यान पहिली चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या चौकशीसाठी जेव्हा पोलिसांनी संशयितांना बोलावले. त्यावेळी विजय जाधव याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतप्त नातेवाइकांनी याबाबत जाब विचारत तेथे गोंधळ घातला. यामुळे रुग्णालयात तणाव निर्माण झाला. सरकारवाडा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाइकांनी समजूत काढली. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


संपूर्ण प्रकारच संशयास्पद
दरम्यान बुधवारी यांची पार्टीनंतर बेपत्ता झालेला दीपक अद्यापही बेपत्ता असून दुसरीकडे पार्टीला उपस्थित असलेला विजय जाधव याने आत्महत्या केल्याने नेमका दीपक गायब झाल्याचे गूढ वाढत चालले आहे. त्यामुळे जोपर्यंत बेपत्ता दीपक पोलिसांना मिळून येत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. दीपक मिळून आल्यानंतर या प्रकरणाचा खरा प्रकार समोर येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक शेख यांनी दिली.