Nashik Crime News नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. नाशिकमध्येही (Nashik) असाच एक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाला अठरा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेरोजगार तरुणाला शासकीय व निमशासकीय कार्यालयात नोकरी (Job) मिळण्यासाठी चार जणांनी आमिष दाखवले. तरुणाकडून चौघांनी तब्बल 18 लाख रुपये उकळले. दोन वर्ष उलटून देखील नोकरी लागली नाही म्हणून तरुणाने पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी तरुणासोबत दमदाटी केली. त्यानंतर तरुणाने थेट पोलीस (Nashik Police) स्टेशन गाठले आणि या चौघांविरुध्द तकार दाखल केली. 


चांगली नोकरी मिळवून देण्याची दिली ग्वाही


याप्रकरणी गोकुळ बाबुराव चुंबळे (रा. गौळाणे ता. जि. नाशिक) या युवकाने फिर्याद दिली आहे. संदिप दुगड, करण राजपूत, विपूल जाधव व राठोड नामक इसम, अशी या संशयितांची नावे आहेत. तक्रारदार व संशयित आरोपी एकमेकांचे परिचित आहेत. 2022 साली संशयितांनी तरुणाची फसवणूक केली आहे. चुंबळे यांना शासकीय व निमशासकीय कार्यालयात ओळखी असल्याचे भासवून व अधिकाऱ्यांशी चांगले संबध असल्याचे चार जणांनी दर्शवले होते. त्यानंतर नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. चांगली नोकरी मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आल्याने चुंबळे यांचा विश्वास बसला. या मोबदल्यात चौघांनी चुंबळे यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी केली. 


पैशाचा तगादा लावल्याने संशयितांकडून दमदाटी


चुंबळे यांनी 1 मार्च 2022 रोजी खुटवडनगर येथील माऊली लॉन्स भागात संशयिताची भेट घेतली. या भेटीत त्यांनी 18 लाख रूपये संशयितांच्या स्वाधिन केले. मात्र अजूनदेखील नोकरी लागली नाही म्हणून त्यांनी पाठपुरावा केला. नोकरीचे काम होत नसल्याने त्यांनी पैशाचा तगादा लावला. त्यामुळे संशयितांनी त्यांच्यावर दमदाटी केली. त्यानंतर चुंबळे यांनी पोलिसात (Police) तक्रार दाखल केली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले (Vasant Khatele) अधिक तपास करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी करायचे भरदिवसा घरफोड्या; दोन उच्चशिक्षितांच्या आवळल्या मुसक्या


Nashik Crime News : एक वर्षापूर्वी सिमेन्स कंपनीत केली होती चोरी; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या