Nashik Bribe News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे. दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांना तब्बल चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली आहे. एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण फक्त लाचेची मागणी करण्यात आल्याने एसीबीला त्यांना अटक करण्यात अडचणी येत आहेत. एका नाशिकमध्ये दिवसाआड लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे बुरखे फाडले जात असताना अशा प्रकारे सर्रास अधिकारी लाच घेत असल्याचे दिसून येत आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने लाचखोरीच्या घटना उघडकीस आणल्या जात आहेत. मागील काही दिवसांत अनेक बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. मात्र तरीदेखील लाचखोरीचा आलेख चढताच आहे. अशातच एसीबीकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. एका खासगी कंपनीची जागा एनए करून देण्यासाठी तब्बल चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांच्या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगी न घेतल्याने त्यांच्या कंपनीस प्रांत अपार यांच्याकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती 40 लाख रुपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीचे दरदिवसाला एक प्रकरण समोर येत आहे. अगदी हजारापासून ते लाखो रुपयांची लाच मागणारे अधिकारी आहेत, अनेकजण लाचलुचपत खात्याच्या जाळ्यातही सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली असली तरीही रोज कुणी ना कुणी लाच मागताना समोर येत आहे आणि हे गंभीर असल्याची चर्चा आहे.
दरम्यान वेळोवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते. सामान्य नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही, त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: