Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीहून महायुतीत कलगीतुरा सुरु असल्याचे चित्र आहे. काल नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शेकडो समर्थकांसह ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर नाशिकमधील जगाचा तिढा आणखीनच बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिकच्या लोकसभेचे हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा केल्यापासून महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
भाजपाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना
आता नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील धुसफूस वाढली आहे. नाशिक लोकसभा जागेवरून भाजप आणि शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता नाशिकमधील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेसंदर्भात नाशिक भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. आज सायंकाळी सागर बंगल्यावर भाजप पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या जागेवर मनसेचाही दावा
नाशिकच्या जागेवर महायुतीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाकडून याआधी दावा करण्यात आला आहे. यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनतर मनसे महायुतीत सहभागी होणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मनसेने महायुतीकडे नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. मनसेच्या दाव्याने महायुतीत धाकधूक वाढली आहे. आता नाशिकची जागा महायुतीत नक्की कोणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
छगन भुजबळही नाशिकच्या जागेसाठी आग्रही
मंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच मिळावी, यासाठी छगन भुजबळ आग्रही आहेत. काल अजित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली. यात भुजबळांनी नाशिकची जागा मागितल्याने महायुतीत पेच वाढत चालल्याचे दिसून येते.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Lok Sabha : ठरलं! नाशिक-दिंडोरीतून मराठा समाज लोकसभेसाठी उमेदवार देणार, 'या' नावांची चर्चा