नाशिक : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या घटनेचे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथे उमटले. महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलीस स्थानकात (Yeola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता या प्रकरणावर महंत रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महंत रामगिरी महाराज म्हणाले की, 177 वर्षांपूर्वी या सप्ताहाला सुरुवात झाली होती. 20 ते 25 लाख लोक येथे येतात. अखंड भजनात तल्लीन होतात. लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही करतो. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. एक ते दीड कोटी लोक बॉर्डरवर उभे आहेत. भारतामध्ये प्रवेश मागत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितले हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे. अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे.
परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी
आमचा त्यामागचा उद्देश एकच होता की हिंदूंनी संघटित राहावे. आम्ही जे वक्तव्य केले त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. आमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस येईल तेव्हा आम्ही बघू. आता सप्ताह सुरु आहे. आम्ही हा सप्ताह झाल्यानंतर पुढे बघू, अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराजांनी यावेळी दिली आहे.
हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री देणार भेट
दरम्यान, नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भेट देणार आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहादरम्यान प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री हरिनाम सप्ताहाला भेट देणार असल्याचे चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावबंदी
महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर चौकात अचानक रात्री मोठा जमाव जमा झाला. त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळले. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला. या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. 16 ऑगस्ट रात्री बारा वाजेपासून ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. तर महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा