Nashik Accident : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सातपूर (Satput) परिसरात 22 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय. तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली आणि तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा (Nashik Accident) व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर एमआयडीसीतील (Satpur MIDC) बॉश कंपनीकडून महिंद्रा कंपनीकडे (Mahindra Company) मयत तेजस गंगाराम बन्से (22, रा. सावरगाव) हा आपल्या दुचाकीने जात होता. प्रबुद्धनगर येथील बाबासाहेब बेकरीसमोर तो आला असता एम. एच. 15 ईजी 0302 या क्रमांकाच्या डंपर शेजारून जात होता.
सिमेंट मिक्सर खाली चिरडला गेल्याने मृत्यू
त्यानंतर तरुणाची दुचाकी सिमेंट मिक्सर ट्रकच्या खाली गेली. या अपघातात तरुण चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झालाय. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून तो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सातपूर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवाहू ट्रेलर उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू
दरम्यान, नाशिक मुंबई महामार्गावरील टाकेघोटीजवळील हॉटेल ग्रँड परिवारसमोर मालवाहू ट्रेलरचा भीषण अपघात झाल्याने या अपघातात चालकाचा ट्रेलरखाली दबून जागीच मृत्यू झाला. ट्रेलर मुंबईहून नाशिककडे जात असताना या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकरवर ट्रेलरचालकाने अचानक ब्रेक मारला आणि ट्रेलरवर असलेला लोखंडी रोल केबिनवर सरकल्याने ट्रेलर पलटी झाला. यात ट्रेलरचा चालक गुड्डू कुमार (38, रा. मुंबई) हा जागीच ट्रेलरखाली अडकून जागेवरच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा सहाय्यक पोलीस निरीक्षक राम व्होडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे यांनी पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघातात ट्रेलरचा चक्काचूर झाला असून, चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या