New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी (Stampede) झाली आणि त्यात तब्बल 18 जणांनी आपले प्राण गमावले. प्रयागराजमधील महाकुंभाला जाण्यासाठी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमली होती आणि त्यानंतरच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. एका प्रत्यक्षदर्शीनं याबाबत एबीपी न्यूजसी बोलताना सांगितलं की, परिस्थिती घाणेरडी होती आणि लोक ट्रेनसमोर पडले. त्यांचे अक्षरशः तुकडे पडले, काही चिरडले गेले, काहीजण गुदमरले आणि मृत्यूमुखी पडले. प्रशासन आलं आणि सर्वांना घेऊन गेलं. 


प्रयागराजला जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलं की, तो त्याच्या कुटुंबासह प्रयागराजला जात होता. त्याच्याकडे ट्रेन क्रमांक 12583 चं तिकीट होतं. त्यानं सांगितलं की, B2 मध्ये रिजर्वेशन होतं. ट्रेन 10.40 वाजता होती. आम्ही 8.30 वाजता पोहोचलो. पण गर्दी खूप होती. परिस्थिती फारच वाईट होती. चेंगराचेंगरी झाली. लोक ट्रेनसमोर पडले. किती लोक पडले, हे मला माहीत नाही. लोक ट्रेनसमोर पडले, कापले गेले, त्यांचे अक्षरशः दोन तुकडे झाले, ते चिरडले गेले आणि मेले. प्रशासन आलं आणि सर्वांना एकाच वेळी घेऊन गेलं. प्लॅटफॉर्म 14-15 वरही खूपच घाणेरडी परिस्थिती होती. संध्याकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत परिस्थिती खूपच तणावपूर्ण होती. माझी ट्रेन निघाली पण आम्ही त्यात चढू शकलो नाही.


रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी कशी झाली? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती रात्री 9.55 वाजता मिळाल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये अनेकजण जखमीसुद्धा झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ही घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर घडली. घटनास्थळी एकूण चार अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या. सुरुवातीला रेल्वेनं चेंगराचेंगरी झाल्याचं नाकारलं. 






सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यामुळे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. अचानक ट्रेन रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर प्रवासी घाबरले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर चेंगराचेंगरी झाली आहे. प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभी असताना ही परिस्थिती उद्भवली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर बरेच लोक उपस्थित होते. दोन गाड्या उशिरानं धावत होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली होती. मग गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण