मनमाड : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांनी पिक विमा काढून सुद्धा त्यांना त्याचे पैसे न मिळाल्याने सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नांदगाव-मनमाडचे आमदार सुहास कांदे यांची थेट विमा कंपनी, केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल केली आहे. सत्ताधारी आमदाराने कोर्टात अशा प्रकारची जनहित याचिका दाखल केल्याने एकच चर्चा होत आहे. 


मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अतिवृष्टी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पिक हिरावून नेले. नांदगाव तालुक्यातील जवळपास 30 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेत भारती इक्सल या कंपनीचा पिक विमा काढला. मात्र त्यापैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांनाच त्याचे पैसे मिळाले. मात्र नांदगाव तालुक्यातील उर्वरीत 24 हजार शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्याचे पैसेच मिळाले नाहीत. शेतकऱ्यांनी अनेक वेळा कंपनीकडे संपर्क साधून देखील त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे लाखो रुपये या विमा कंपनीकडे शिल्लक असून कंपनी त्याकडे कानाडेळा करत आहे.


शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचे पैसे न मिळाल्यास किसान सभे तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे किसान सभेचे संघटक विजय दराडे यांनी सांगितलं. केवळ नांदगाव तालुकाच नाही तर नांदगाव विधानसभा मतदार संघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी विमा कंपनी विरोधात स्थानिक पोलिसात तक्रार अर्ज दाखल केले आणि त्यांनंतर थेट उच्च न्यायालयात जनहित विमा कंपनीला जबाबदार धरत प्रतिवादी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारला नोटिस बजावली आहे. एकूणच सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने दाखल केलेल्या या जनहित याचिकेचा काय निकाल लागतो याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे. 


इतर बातम्या