मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाचा अंदाज काय?
मुंबईत देखील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. आज आणि उद्या मुंबई हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई 18 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात काय स्थिती?
विदर्भात आज काही ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भात 17 आणि 18 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भासाठी १८ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमानात विदर्भात काही बदल बघायला मिळणार नाही. काही जिल्ह्यातील तापमान 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहू शकतं.
मराठवाड्यात काय आहे पावसाची स्थिती?
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बघायला मिळेल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसामुळे मराठवाड्यातील पीकांना दिलासा मिळणार आहे. आज बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात काही ठिकाणी प्रामुख्याने 60-70 मिमीपर्यंत पावसाचा अंदाजआहे.
कोकणात कसा असणार पावसाचा अंदाज?
कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताआहे.
मध्य महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती?
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणीअतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र, 19 ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर बघायला मिळणार आहे. प्रामुख्याने घाट परिसरात चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. नाशिकसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातीलपाणीपातळीत वाढ होईल. 18 ऑगस्ट रोजी नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट ठेवण्यात आला आहे तर नंदुरबार आणि धुळ्यासाठी यलो अलर्ट असेल.
संबंधित बातम्या :