नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली आहे. आज त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होत आहे. नाशिकमध्ये पाय ठेवण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मनोज जरांगेंची शांतता रॅली नाशिकमध्ये येत असताना पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. 


मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर शेलक्या भाषेत टीका


शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही भुजबळ यांच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. ते रस्त्यावर खुर्ची टाकून जरी बसले तरी कुणीही लक्ष देणार नाही. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे वाटोळे होते. भुजबळ अपशकुनी आहेत.  छगन भुजबळ यांना फक्त भांडण लावण्याचे काम आहे. भुजबळांच्या सांगण्यावरून अंतरवाली जवळ आंदोलन बसले होते. अंतरवालीत मिरवणूक काढण्यात काढली तेव्हा दंगल करण्याचा भुजबळांचा डाव होता. माझ्या जुन्या गावात दगडफेक केली. तिथल्या पीएसआयने त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. पीएसआय मुद्दाम घटनास्थळी गेले नाही. उलट आमच्याच लोकांवर केसेस केल्या. पोलिसांवर दबाव होता मात्र दिवस बदलतात, त्यावेळी पीएसआयकडे बघू, असे त्यांनी म्हटले आहे. 


दरेकरांना फक्त देवेंद्र फडणवीसांचा पुळका


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावरही जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, मागच्या दाराने फुकट आमदार होणाऱ्याला समाजाचा आक्रोश कळणार नाही. फडणवीसांनी हात टेकले, तर हे कोण? दरेकर पागल झाले आहेत. त्यांनी 12 महिने आंदोलनाला बसावे, मग कळेल. देवेंद्र फडणवीस यांची भाकरी खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो. त्यांना काय बोलावे याची अक्कल नाही. दरेकरांसारखेच भंगार क्वालिटीचे आमदार मराठा समाजाच्या विरोधात बोलताय. दरेकरांना फक्त देवेंद्र फडणवीसांचा पुळका आहे. फडणवीसांनी बोलल्यावर दरेकरांना वाईट वाटतं, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 


नितेश राणे हेंदड, त्याला कोण विचारतं?


नितेश राणे यांच्याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्या पोराला आम्ही किंमत देत नाही. ते हेंदड त्याला कोण विचारतं? मी नारायण राणेंचा सन्मान करतो. मात्र त्यांनी नितेश राणेंना समज द्यावी. मला कुणी बळचं बोलले तर मी कसं काय सोडेन? समाजाने नारायण राणेंवर बोलताना मात्र तारतम्य ठेवावे. मात्र नारायण राणेंनीही सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. त्यांनी शब्द तोलून मापून बोलावे, बारीक पोरासारखे बोलू नये. त्यांनी समाजाच्या बाजूने राहावं, देवेंद्र फडणवीसांच्या बाजू ओढू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Video : नाशिकमधून मनोज जरांगेंची मोठी घोषणा; बालेकिल्ल्यात भुजबळांना इशारा, थेट कॉलर उडवली