Nashik Nandgaon News नांदगाव : मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते (Sandip Mohite) हे लेह लडाख (leh ladakh) येथे मशीन ऑपरेटिंग करताना शहीद झाले. जवान संदीप हे १०५ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सन २००९ मध्ये ते भारतीय सैन्यदलात (Indian Army) भरती झाले होते. अपघात झाल्याने त्यांना लेह लडाखच्या सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे नांदगाव तालुक्यावर (Nandgaon Taluka) शोककळा पसरली आहे. 


नांदगावचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, गटविकास अधिकारी संदीप दळवी तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप, दिनेश पगार, माजी सैनिक नानासाहेब काकळीज यांनी संदीप मोहिते यांच्या निवासस्थानी जात घटनेची माहिती दिली.


2009 पासून होते सैन्य दलात


संदीप मोहिते हे 2009 साली सैन्यदलात भरती झाले. त्यांनी पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंदीगड,अरुणाचल प्रदेश,पठाणकोट, येथे सेवा बजावली. याच दरम्यान साऊथ सुडान येथे विदेशात शांतीसैनिक म्हणून शांतीसेनेत त्यांनी काम केले होते. आता ते लेह लडाख येथे कार्यरत होते, अशी माहिती त्यांचे सैन्यदलातील सहकारी दिपक सोमवंशी (Dipak Somwanshi) यांनी दिली आहे. 


गेल्या आठ वर्षांपूर्वी मामाची मुलगी मनिषा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सकाळीसच पती-पत्नीमध्ये भ्रमणध्वनी वरुन संभाषण झाले होते. त्यांच्या पश्चात देवराज (5) दक्ष (3) अशी दोन मुले असून वडील भाऊसाहेब मोहीते,आई प्रमिला मोहीते भाऊ शिवाजी मोहिते हे आपला शेतीव्यवसाय करत असून श्रीकांत मोहिते हे सैन्यदलात आहे.


निवासस्थानाकडे जाण्यासाठी तत्काळ करणार रस्त्याचे काम


लेह लडाख येथील हवामान खराब असल्याने त्यांचे पार्थिव केव्हा येणार याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती समजु शकली नाही. तसेच ते मांडवड (Mandwad) बारखडी शिवारात राहत असून त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी तत्काळ रस्त्याचे काम जेसीबीद्वारे हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनमाड बाजार समितीचे संचालक विठ्ठल आहेर, अशोक निकम व सागर आहेर यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या