मालेगाव : मालेगाव महापालिकेने (Malegaon Municipal Corporation) झोपडपट्टी धारकांना दिलेल्या फोटोपाससाठी जमा केलेल्या कागदपत्रांच्या अपात्र फाईल्स थेट बाजार पेठेतील रस्त्यावर आढळून आल्या आहेत. त्यामुळे नाशिक मालेगाव महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. तसेच या फाईल्यबाबत महानगरपालिका प्रशासनाने बचावत्मक कारण दिलंय. तसेच भ्रष्टाचार लपविण्यासाठीच या फाईल्स गायब करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप  मालेगाव विधायक संघर्ष समितीकडून करण्यात आलाय. 


महापालिकेचा हा कारभार काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर  महानगरपालिकेला उपरती आल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर महानगरपालिकेने फाईल्सच्या भरलेल्या गोण्या या पंचनामा करत ताब्यात घेतल्या आहेत. तसेच संबंधित विभागाला पत्र काढत खुलासा देखील मागवण्यात आला. 


नेमकं प्रकरण काय?


झोपडपट्टी धारकांना दिलेल्या फोटोपाससाठी जमा केलेल्या कागदपत्रांच्या अपात्र फाईल्स या मालेगाव महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र टाऊन हॉलचे काही काम सुरू असतांना या फाईल्स भरलेल्या गोण्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिथून गायब करत मालेगावच्या बुनकर बाजार पेठेत त्या फाईल्स रस्त्यावर सापडल्या. मालेगावच्या काही सुज्ञ नागरिकांनी ही बाब महापालिकेच्या लक्षात दिली. 


कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा


या प्रकरणानंतर महापालिका प्रशासनाने तात्काळ जबाबदार अधिकाऱ्यांना पाठवून त्या फाईल्स पंचनामा करत ताब्यात घेतल्या.  दरम्यान, ज्या खात्याशी संबधित त्या फाईल्स आहेत त्यांना याबाबत खुलासा मागविण्यात आला असून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.


नागरिकांचे प्रश्न


बाजारपेठेत आढळून आलेल्या या फाईल्स बाबत मालेगावातील काही सुज्ञ नागरिकांनी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच या फाईल्स कुणी आणि कशासाठी बाजारपेठेत नेल्यात ? त्या फाईल्समध्ये काही संशयास्पद व्यवहार होते का ?भ्रष्टाचार दडविण्याठी हा सर्व प्रकार घडविण्यात आला का ? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आयुक्तांनी संबंधित विभागाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी देखील मालेगाव विधायक संघर्ष समितीने केली आहे. 


महानगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांच्या देखील मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान या प्रश्नांची उत्तरं महानगरपालिकेच्या चौकशी अंतीसमोर येणार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Covid Scam :कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, 'या' दोन नावांचीही सभागृहात चर्चा