Nashik Dada Bhuse : मालेगाव बाजार समितीचा (Malegaon Bajar Samiti) निकाल आमच्या विरोधात गेला, हा मतदारांचा कौल असून तो आम्हाला मान्य आहे. ही वस्तुस्थिती असून कुठे कमी पडलो, हे लक्षात त्या दृष्टीने प्रयत्न सुरु राहतील, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. सोबत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याला उभारी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही दादा भुसे म्हणाले.
आज सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री दादा भुसे (Dada Bhsue) हे आज नाशिकमध्ये (Nashik) महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे राज्य देश पातळीवर आघाडीवर राहावे, अशा शुभेच्छा दादा भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.
दादा भुसे पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने संबंध महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागातील पंचनामे झाले असून काही ठिकाणी पंचनामे सुरु आहेत. ज्या भागात प्रशासन पोहचलेले नाही, तेथील माहिती कळवा, प्रशासन येऊन पंचनामे करतील अशी ग्वाही भुसे यांनी यावेळी दिली. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तिथे तीन दिवसांच्या आता पंचनामा झाले आहे. मात्र अद्यापही अवकाळी पाऊस काही पाठ सोडत नाही. संकटाची मालिका सुरू आहे, अवकाळी पाऊस येतो आहे. शेतकऱ्यांना अलर्ट दिला जात आहे, मात्र पाऊस जोरदार असल्याने नुकसान होतंय. मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊन नका, सरकार तुमच्या पाठीशी उभे असून जिथे पंचनामे झाले नसेल तर माझ्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.
मतदारांचा कौल मान्य
तर आज मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर भुसे म्हणाले की, महाराष्ट्र दिन म्हणजे आपला आज शुभ दिवस आहे. राज्याची प्रगती कशी होईल, आपला देश प्रगती पथावर कसा जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारकडून महिला भगिनी, वंचित घटक, कामगार यांच्यासाठी चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र दुसरीकडे विरोधक काही अपप्रचार करत आहेत. तर नाशिक जल्ह्यातील बाजार समित्यांची रणधुमाळीत मालेगाव बाजार समिती निवडणुकीत दादा भुसे यांना मोठा धक्का बसला. यावर ते म्हणाले, मालेगावचा निकाल विरोधात गेला, ही वस्तुस्थिती आहे. मतदारांचा कौल मान्य आहे. काही चुका झाल्या असतील, तर सुधारणा केल्या जातील, असेही ते म्हणाले.