Malegaon News मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या (Leopard) मुक्त संचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील जय भवानी रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. आता मालेगाव (Malegaon) शहरात भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.  


मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता. यावेळी मोहित विजय आहिरे (Mohit Vijay Ahire) या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीत जेरबंद केले. शहरातील भायगाव, जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये ही घटना घडली. बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी वनविभाग, पोलीस, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 


वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला केले जेरबंद


बिबट्या लॉन्समध्ये शिरल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नाशिक येथील रेसक्यू टीमसह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्लो पाईपद्वारे डॉट देत बिबट्याला भुल दिली. बिबट्या बेशुद्ध होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केले. हा बिबट्या नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी (Forest Department) दिली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 


चिमुकल्याचे प्रसंगावधान


याबाबत मोहित विजय आहिरे या चिमुकल्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता तो म्हणाला की, मी लॉन्सच्या ऑफिसमध्ये बसलो असताना मला बिबट्या आल्याचे समजले. बिबट्या एका खोलीत शिरला असता मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली, असे या चिमुकल्याने म्हटले आहे. या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून यामुळे चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.   


जय भवानी रोडवर पुन्हा बिबट्याचे दर्शन


नाशिकच्या जय भवानी रोड (Jay Bhavani Road Nashik) परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने (Leopard) दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास लोणकर मळ्यात भक्ष्याच्या शोधात एक बिबट्या आला असता भटक्या कुत्र्यांनी भूंकण्यास सुरुवात केली आणि अखेर बिबट्याने इथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे, वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


आणखी वाचा 


...अखेर नाशिकचा स्मार्ट रोड नवव्या दिवशी वाहतुकीसाठी खुला, मनपाकडून रात्रीच रस्ता चकाचक