Nashik News : गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु होते. शेतकरी आंदोलनाबाबत प्रशासनासोबत तब्बल बैठका झाल्या होत्या. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत झालेल्या सहाव्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन आठव्या दिवशी मागे घेतले. 


सोमवारी रात्री आंदोलकांना घरी जाण्यासाठी प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास आंदोलनकर्ते आपल्या घराकडे रवाना झाले. सीबीएस, अशोक स्तंभ हा खरंतर नाशिक शहरातील मुख्य रस्ता मानला जातो. मात्र माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बेमुदत आंदोलन पुकारल्याने हा रस्ता गेल्या आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 


सीबीएस-अशोक स्तंभ रस्ता वाहतुकीसाठी खुला


यामुळे शहरवासीय वेठीस धरले गेले होते. विद्यार्थी, सरकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर काल सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आता आठ दिवसानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रात्रीतूनच महापालिकेकडून रस्त्याची साफसफाई देखील करण्यात आली आहे.


शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - दादा भुसे


दरम्यान, शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत तीन महिन्यात काम मार्गी लागणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेक विषय प्रगतीपथावर आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाचे फोनवरून बोलणे करून दिले आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांचे समाधान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


तीन महिन्यात मागण्या पूर्ण होण्याचं आश्वासन - जे पी गावित


माजी आमदार जे पी गावित म्हणाले की, आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेत त्यावर आश्वासन दिले. तीन महिन्यात या मागण्या पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयात पोहचले आहे.  पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील आम्हाला हमी दिली आहे. तीन महिन्यात मागण्या पूर्ण होण्याचं आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे आम्ही धरणे आंदोलन मागे घेत आहोत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा लढा सुरू होईल याची शासनाने आणि भुसे यांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


'आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा'; शेतकरी संमेलनात नाना पाटेकरांनी व्यक्त केला संताप