Nashik News : कधी कोण संकटात धावून येईल आणि आपल्याला संकटातून बाहेर काढेल सांगता येत नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं की देव स्वतः येत नाहीत तर माणुसकीच्या रूपात नेहमीच भेटता असतो. असाच काहीसा प्रकार एका आईनं अनुभवला आहे. धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत महिलेची प्रसूती करण्यात आल्याची घटना नांदगाव (Nandgoan) रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. 


जानेवारीच्या 30 तारखेची ही गोष्ट. संजना ही गरोदर होती, तिला नववा महिना सुरु होता. बाळंतपणासाठी ती भुसावळवरून (Bhusawal) तिच्या गावी म्हणजेच कल्याणला जात होती. तिच्यासोबत तिचे पती होते. पण चालत्या ट्रेनमध्येच तिची प्रसूती झाली. नेमकं घडलं काय तर? झालं असं नऊ महिन्यांची गरोदर असलेली संजना एक्स्प्रेसने कल्याणला जाण्यासाठी निघाली. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर तिला प्रसव वेदना जाणवू लागल्या. प्रसव वेदना सुरू झाल्याने तिला त्रास जाणवू लागला. याचवेळी तिच्या जिवाची सुरू असलेली घालमेल सहप्रवासी महिला व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. अन् त्यानंतर महिलांनी प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची रेल्वेच्या बोगीतील शौचालयाजवळ प्रसूती करण्यात आली. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.


गोरखपूरहून मुंबईसाठी निघालेली 'काशी एक्स्प्रेस' (Kashi Express) भुसावळ-नांदगाव रेल्वेस्थानकाच्या दरम्यान असताना ही घटना घडली. संजना दत्ता चव्हाण असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. नांदगाव रेल्वे स्थानकात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रेल्वे विभगाचे डॉ.संदीप ठोके हे रुग्णवाहिका व वैद्यकीय टीमसह हजर झाले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून महिला व तिचे नवजात बालक हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण येथील दत्ता चव्हाण व त्यांचे कुटुंबीय हे भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. दत्ता यांची पत्नी गरोदर असल्याने तिला भुसावळ येथील शासकीय रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले.


अशी झाली प्रसूती... 


दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकातून काशी एक्स्प्रेसने चव्हाण कुटुंबीय कल्याणकडे रवाना झाले. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर दत्ता यांची पत्नी संजना हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पुढे नांदगाव रेल्वे स्थानकावरील डॉ. संदीप ठोके यांच्याशी संपर्क करण्यात आला. मात्र त्रास अधिकच वाढत चालल्याने रेल्वे कर्मचारी व रेल्वेतील सहप्रवासी असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत डब्यातील शौचालयाजवळ जावून संजना हीची प्रसूती करण्याचे ठरवले आणि त्यानुसार प्रसूती ही करण्यात आली.