Nashik News : वेगवेगळे प्रसंग आणि घटनांची वळणं घेत राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पाडणार्या नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघात एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडी समोर आल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) शिंदे भाजप गटातील नेत्यांनी अखेरच्या क्षणी सत्यजीतला (Satyajeet Tambe) पाठिंबा देत पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या संघटनांच्या मिळालेल्या पाठिंब्यानंतर भाजपने (BJP) दिलेला पाठिंबा सत्यजीतसाठी निर्णायक ठरेल यात शंका नाही.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात कोणताही निर्णय थेट जाहीर न करता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची घोषणा केली. त्यानंतर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पक्ष देईल तो आदेश हा ठेवणीतला शब्दप्रयोग करताना भूमीपुत्राला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत वक्तव्य सर्वप्रथम केले. थोरात-विखे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या राज्याला ज्ञात असतांना डॉ. विखे यांनी सत्यजीत तांबे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार करुन आपली यंत्रणाही कामाला लावली हे विशेष. सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडून पाठिंबा मागितलेला नसताना भाजपकडून मात्र त्यांना स्थानिक पातळीवरून थेट पाठींबा मिळायला प्रारंभ झाला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून अगदी मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत घडलेल्या विविध राजकीय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेत आला. मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपाकडून हालचाली वाढल्या आणि अनेक नेते सत्यजीतच्या बाजूने उभेसुद्धा राहिले. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर थेट सत्यजितचा विजय निश्चित आहे, असं वक्तव्य करत सत्यजीतने भाजपात प्रवेश करावा अस सांगत भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचा ते सन्मान व आदर ठेवतील अशी आशा व्यक्त केली.
ही निवडणूक पाच जिल्ह्यातील असली तरी नगर जिल्ह्यात सर्वधिक मतदार आहेत. सत्याचा विजय करण्यासाठी भाजप सरसावली असून सत्याचच विजय होईल असं वक्तव्य भाजप नेते राम शिंदे यांनी करत सत्यजीतच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचे स्पष्ट केले. एकीकडे स्थनिक भाजप पाठीशी उभे राहत असताना शिंदे गटानेसुद्धा सत्यजीतच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व शिवसैनिक सत्यजित तांबेना मदत करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी केले होते.
नाशिक पदवीधर मतदार संघातील एकूण मतदारापैकी 44 टक्के मतांचा वाटा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. भाजपाकडून पाठिंबा न मागताही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिलेला पाठिंबा, त्यामुळे सत्यजीत तांबे यांचा विजय विधान परिषदेच्या इतिहासातील ‘न भूतो न भविष्यति ठरला तर नवल वाटायला नको, अशीच परिस्थिती सध्या नाशिक पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहे.