Nashik Hospitals Fire Audit : भंडारा, अहमदनगर यासारख्या ठिकाणी आग लागल्याच्या मागील काही महिन्यात घडल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील सर्व सामान्य रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेच्या धर्तीवर नाशिक मधील 200 हुन अधिक रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना याबाबत नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही मात्र, कुठेही फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे.


दरम्यान राज्यात सातत्याने अनेक सामान्य रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार दरवर्षी फायर ऑडिट करुण घेणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न समोर आला आहे. एका माहितीनुसार नाशिकमध्ये तब्बल 200 हून अधिक रुग्णालयांना नोटीस देऊन देखील रुग्णालयाचे फायर ऑडिट न केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यामुळे सदर रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. 


नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जिल्हाभरातून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयांत अनेकदा कर्मचाऱ्यांचा तुडवडा जाणवतो. किंवा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे विविध व्यवस्था असायला हव्यात. त्यातील अनेक सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 78 रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयांचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करून पालिका प्रशासन कारवाई करणार असल्याची माहिती आहे. 


दरम्यान काही दिवसापूर्वी शहरातील सर्व हॉस्पिटल प्रशासनांना फायर ऑडिट सादर करण्याचे निर्देश नाशिक महापालिका प्रशासनाने दिले होते. या निर्देशानंतर देखील शहरातील 200 हून अधिकरुग्णालयांकडून फायर ऑडिट करण्यात आल नाही. त्यामुळे आता या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. एकूण रुग्णांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करून त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.


फायर ऑडिट बंधनकारक 
नाशिक जिल्हा रुग्णालय त्याचबरोबर इतर शासकीय रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात. अनेकदा त्यांना आरोग्य सुविधांची वाणवा असते. तर अनेकदा आगीच्या घटना उघडकीस येतात. त्यासाठी रुग्ण, नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्वाची असते. म्हणून सर्व शासकीय कार्यालयांचे फायर ऑडिट करणे आवश्यक असून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश असतांना जिल्ह्यातील रुग्णालयात त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याठिकाणी दररोज हजारो रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात, अशात या रुग्णालयातील फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.