नाशिक: जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा शाखा अभियंता दीड लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करुन देताना टक्केवारीची मागणी केल्यानंतर ती लाच घेताना या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्यामुळे नाशिकची जिल्हा परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


अमोल घुगे असे लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. पाणी पुरवठ्याच्या कामातून टक्केवारी घेण्याच्या उद्देशाने दीड लाखांची रुपयांची लाच घेताना घुगे यास  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेतल्याने जिल्हा परिषद कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.


जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत मौजे पाथरे ता. सिन्नर येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. तक्रारदार हा शासकीय स्थापत्य कंत्राटदार असून त्यांनी या कामाचे 48 लाख रुपयांचे बिल तयार करून ते मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात घुगे यांनी देयकाच्या 4 टक्के रक्कम म्हणजेच 1 लाख 90 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 3 टक्के प्रमाणे दीड लाख रुपये कार्यालयात होते. 


दरम्यान ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा लावला. यावेळी घुगे यांना दीड लाखांची रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने कार्यालयात रंगेहाथ पकडले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


कायदा सुव्यवस्थचे बारा
एकीकडे शहरात कायदा सुव्यवस्थचे बारा वाजले असताना अशा पद्धतीने अधिकारी वर्ग लाच घेत असल्याने विश्वास तरी कुणावर ठेवावा असा सामान्य नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे अशा सातत्याने घडतांना वाचायला मिळतात. मात्र काही दिवसांनी घटनेतील संशयित पुन्हा कामावर रुजू होऊन असे कृत्य करायला धजावतात. त्यामुळे पोलिसांचा किंवा यावर अंकुश ठेवणाऱ्या प्रशासकीय संस्था नेमकी काय कारवाई करतात, हे न उलगडलेले कोडे सामान्य नागरिकांसाठी कोडेच ठरते.