नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Muhs) एमबीबीएस (MBBS) या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याची (MBBS Paper Leak) घटना घडली होती. आता या प्रकरणी महाविद्यालय, विद्यापीठ आणि पोलिसांच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली असून त्या माध्यमातून तपास केला जात आहे. पेपर सुरू होण्याआधीच सोशल मिडियावर पेपर व्हायरल झाल्याची तक्रार आल्यानं पेपर फुटीचा तपास केला जात आहे.
2 डिसेंबरपासून आतापर्यंत चार पेपर झाले असून फार्मकॉलॉजी - 1 आणि पॅथॉलॉजी - 2 या विषयाचा पेपर फुटला आहे. तर आणखी एक पेपर लीक झाल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे फार्मकॉलॉजी 1 या विषयाची पुन्हा 19 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे तर उर्वरित दोन पेपर ऐनवेळी बदलण्यात आले आहेत. मुंबईतील दोन आणि आंबेजोगाईतील एका कॉलेजने पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठकडे केली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पेपर वाटप करतानाचे cctv विद्यापीठाने ताब्यात घेतले असून महाविद्यालय स्तरावर चौकशी समिती गठीत करून अहवाल मागविण्यात आला आहे. त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर पोलिसांच्या माध्यमातून ही पेपर फुटीची चौकशी सुरू झाली असून पेपर कोणी लिक केला? कोणा-कोणाला फॉरवर्ड केला? याबाबत तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. पेपर फुटल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असल्याने पुन्हा पेपर लिक होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
विद्यापीठाची डोकेदुखी वाढली
2 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात होणाऱ्या एमबीबीएस परीक्षेचा MCQ स्वरूपातील पेपर परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे एक तास आधी व्हायरल झाला होता. विद्यापीठाला या प्रकाराची माहिती ईमेलद्वारे मिळताच तातडीने परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यभरातील 50 केंद्रांवर सुमारे 7 हजार 900 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परंतु पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा ताण सहन करावा लागणार आहे. या लिकची माहिती विद्यापीठाला ईमेलद्वारे मिळाली. ईमेलच्या स्त्रोताची तपासणी करण्यासाठी आणि संपूर्ण डिजिटल ट्रेलसाठी विद्यापीठ सायबर सेलचा समावेश करण्यात आला आहे. पेपर फुटल्याने विद्यापीठाची डोकेदुखी वाढली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या