Nashik Latest News : शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद नाशिक मध्ये चांगलाच रंगला असून शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे हल्ल्यातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हे चारही संशयित शिंदे गटातील असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमधून शिवसेना -शिंदे गटाच्या वादाचा पहिला अंक सुरू झाल्याचे दिसून येत आहे. 


शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र शहरात मनाई आदेश लागू झाल्याने शिवसैनिकांचा मोर्चा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज सकाळी पोलीस आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेले होते. शिवसैनिक आक्रमक झाल्याने दुपारनंतर याचा परिणाम दिसून आला. कारण बाळा कोकणे हल्ला प्रकरणातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले.


काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर शहरातील एमजी रोड परिसरात हल्ला झाला. या हल्ल्यात बाळा कोकणे गंभीर जखमी झाले. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्या संदर्भात 30 जुलै रोजी शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आणि याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते. 


दरम्यान नाशिक पोलिसांकडून कालच शहरात मनाई आदेश लागु केले. त्यामुळे मोर्चे, आंदोलनांना मज्जाव करण्यात आला. त्यातच शिवसेनेचा मोर्चाही आल्याने शिवसेना आक्रमक झाली. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मात्र मोर्चाच्या आधीच हल्ला प्रकरणातील चार संशयितांना अटक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


शिवसेना - शिंदे गट वाद चिघळणार
दरम्यान शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर नाशिकमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. शिंदे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासण्यात आले होते. तिथूनच शिंदे ठाकरे गटात संघर्षाचा पहिला अंक नशिकमध्ये सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनतर बाळा कोकणे यांच्या हल्ला करण्यात आला. या प्रकरणी जाब विचारण्यास गेलेलव शिवसेनेचे शिष्टमंडळ माघारी फिरताच चार संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय या प्रकरणात शिंदे गटाचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्याने त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. 


पोलिसांकडून संशयितांना अटक
शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. या प्रकरणी आज पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून मनोज पाटील, पंकज सोनवणे,सागर दिघोळे, सूरज राजपूत हे चार  संशयित हल्लेखोर गजाआड केले आहेत. राजकीय वैमनस्यातून शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावरील हल्ला प्रकरणात शिंदे गटाचा हात असल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला आहे. नाशिक शहर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.