Nashik Water Crisis : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु असताना नाशिक (Nashik) जिल्ह्यात मात्र रिपरिप सुरु आहे. तर जिल्ह्यातील काही अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. असे असताना आता शहराला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) पाणी साठा घटल्याने मनपा आयुक्तांनी (Nashik NMC Commissioner) पाणी कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांना आता पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार सुरवात केली आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोकण आदी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. मात्र पावसाचे महत्वाचे शहर असलेल्या नाशिक शहरांसह जिल्ह्याला सध्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील चांदवड, मनमाड, इगतपुरी, देवळा, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी पहिल्या पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली असून पावसाच्या प्रतीक्षेत नाशिककर आहेत. शिवाय पेरण्या देखील रखडल्या असून अनेक भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


दरम्यान या पार्श्वभूमीवर आज नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बैठक घेत पाणी साठ्याचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले कि, जिल्ह्यातील धरणासह नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाणी साठा कमी असल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढवू शकते. शिवाय येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास १५ जुलैनंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आत नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार लटकली आहे. 


पाणी कपातीचे संकट गडद : भुजबळ 
नाशिकवर सध्या पाणी कपातीचे संकट गडद असल्याने यावर देखील भुजबळाने चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पाऊस सुरू असला तरी नाशिक मध्ये अजून पाऊस सुरू झालेला नाही. जिल्ह्यात फक्त दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या तर मात्र अनेक ठिकाणी पेरण्या रखडले असल्याचे त्यांनी सांगितले. तर नाशिकच्या गंगापूर धरणात फक्त 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नाशिककरांना केले. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या देखील वाढत असून जिल्हातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे भुजबळांनी सांगितले.