Nashik NCP Agitation : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडी आता अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भारतामधील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर काल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसली आहे. कालपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढल आहे. याच महागाई विरोधात नाशिकमध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेसने आज मोदी सरकार (Modi Government) विरोधात आंदोलन केले आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्ष आनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बंडखोर आमदारांवर केलेला खर्च मोदींनी पद्धतशीर वसूल करण्यास सुरुवात केली असून मोदी सरकारने पुन्हा गृहीणींच्या माथी लाकडाची मोळी लादली आहे. केंद्र सरकारने 50 रुपयाने गॅस दरवाढ केल्याने 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना 1053रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजारचा आकडा पार केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याची भावना यावेळी आंदोलन महिलांनी व्यक्त केली.
महिला आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत 'महागाईवर हल्ला बोल' 'केंद्र सरकारवर हल्लाबोल,” “मोदीजी पर हल्लाबोल”, “महंगा सिलेंडर हल्लाबोल”, “बहोत हुई महंगाई की मार !!बस करो मोदी सरकार!!”अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्व सामान्य जनतेला गॅस परवडणार नाही म्हणून आंदोलकांकडून लाकडाच्या मोळी व गोवऱ्या भेट देण्यात आल्या. यावेळी, सुवर्णा गांगोडे, शितल भोर, संगिता राऊत, भारती खिरारी, ज्योती भोर, मंगल माळी, सुरेखा कुऱ्हाडे, रूपाली अहिरे, निशा झनके, रूपाली तायडे, वैशाली ठाकरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
तर राष्ट्रवादीच्या नेत्या प्रेरणा बलकवडे म्हणाल्या कि, यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती.सत्तेवर येण्यासाठी भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या आहेत. म्हणूनच या संवेदनाहीन क्रूर सरकारचे दरवाढ केलेले सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत आहेत. तसेच “क्या पेट्रोल, क्या डिझेल, क्या गॅस.. समदं ओके मध्ये” म्हणता म्हणता हे सरकार सबका सत्यानाश करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.