Nashik Police  : गंगापूर रोड परिसरात सकाळी झालेल्या खुनानंतर संशयित अतुल यास ताब्यात घेतले. मात्र संशयित अतुल यास ताब्यात घेताना नाशिकच्या महिला कॉन्स्टेबल असलेल्या सरला खैरनार यांच्या डॅशिंग कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून दिवसाढवळ्या खून, घरफोडी आदी घटनांनी शहर हादरत आहे. आज सकाळी गंगापूर रोड परिसरातल्या पाईप लाईन रोडजवळ दोघं मित्रांच्या किरकोळ भांडणात एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे काही वेळातच या घटनेतील संशयित अतुल सिंग यास अटकही करण्यात आली. 


दरम्यान घटना झाल्यानंतर पळ काढलेल्या संशयितास शिताफीने ताब्यात घेणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे कौतुक होत आहे. झालंही असंच या घटनेतील मयत पवन पगारे (राहणार कानिफनाथ नगर, सातपूर कॉलनी) आणि संशयित अतुल संजय सिंग (सोमेश्वर कॉलनी) हे दोघे मित्र असून गाडीवर फिरत होते. मात्र आज सकाळी गंगापूर रोड परिसरातील पाईप लाईन रस्त्याकडे हे दोघेजण भांडत होते. संशयित सिंग हा मृत पवन याच्याकडे गाडी मागत होता. मात्र पगारे हा गाडी देत नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. मात्र हा वाद सहन न झाल्याने संशयित अतुल सिंग याने मृत पवन यांच्यावर चाकु हल्ला करीत पळ काढला. या हल्ल्यात घाव वर्मी बसल्याने पवन पगारे याचा जागीच मृत्यू झाला. 


या दरम्यान येथून जाणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या लक्षात ही गोष्ट आल्याने तिने तात्काळ संशयित अतुलचा पाठलाग केला. यावेळी संशयित अतुलने हातातील चाकूने पोलीस कॉन्स्टेबल सरला खैरनार यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्न केला. मात्र डॅशिंग खैरनार यांनी हा हल्ला परतवून लावत त्याच्या मुसक्या आवळल्या. तात्काळ घटनेची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. 


महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार यांच्या धाडसाचे कौतुक करावे तितकं कमी आहे. एकीकडे शहर खुनाच्या घटनांनी हादरत असताना अशा पद्धतीने पॉलिसी खाक्या दाखवून संशयितांना जेरबंद करणे किती धाडसाचे हे हे या घटनेवरून लक्षात येते