Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील चोरीच्या एकूण 14 मोटार सायकलीसह चौघा संशयित चोरटयांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Nashik Crime Branch) पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही उच्चशिक्षित असून मौजमजा करण्यासाठी चोरी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


नाशिक शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान यामागील काही चोरीच्या घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोटारसायकल चोरी संदर्भात गोपनीय माहिती मिळाली. मोटारसायकल चोरी करणारे चोरटे हे अंमळनेर येथे रहात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. 01 पथकासह सरकारी व खासगी वाहनाने रवाना होऊन विशेष मोहिम हाती घेऊन गुप्त बातमीदार नेमून घटनास्थळाकडे रवाना झाले. 


दरम्यान गुन्हेशाखेचे पथक अमळनेर येथे पोहचले असता त्यांनी संबंधित चोरट्यांचा मागोवा घेऊन सापळा रचला. यावेळी पोलिसांच्या जाळ्यात दोघे मोटर सायकल चोरटे अडकले. अमोल दशरथ पाटील, विशाल अधिकार पाटीलयांना शिताफीने ताब्यात घेतले. तात्यांची सखोल चौकशी केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर साथीदारांची नावे घेतली. पथकाने पकडलेल्या दोघांनी साथीदार दिनेश पाटील व मल्हार पाटील यांच्यासोबत मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान त्या त्या ठिकाणी जाऊन दोघांनाही अटक करण्यात आली. 


स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून नाशिक शहर व इतर ठिकाणावरुन चोरी केलेल्या जवळपास सहा लाख रुपये किंमत असलेल्या एकुण 14 मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर प्रकरणात त्यांचा काही हात आहे का? याबाबत पोलीस तपास करीत आहे. 


सदरची कार्यवाही नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्षनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पीएसआय विष्णू उगले व पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, येवाजी महाले, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, मोतीराम चव्हाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, आण्णासाहेब गुंजाळ यांनी केली आहे.


संशयित उच्चशिक्षित 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित हे उच्चशिक्षित असून नाशिक शहरामध्ये नोकरीच्या निमिताने येवून सातपुरमधील मोठ मोठया कंपन्यांचे समोरील पार्कींग मधुन मौजमजा करण्यासाठी मोटार सायकली चोरी नेट असत. चोरी केल्यांनतर मोटर सायकलची विक्री हि अंमळनेर येथील येथील नागरिकांना केली जात असे. दरम्यान पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, नागरीकांनी त्यांची वाहने घरासमोर अगर इतर ठिकाणी पार्कींग करतांना त्या सी.सी.टि.व्ही. कॅमे-यात दिसतील अशा पध्दतीने पार्क कराव्यात. तसेच मोटार सायकलींचे स्विच व हॅन्डेललॉक वेळोवेळी चेक करुन ते चांगले आहे अगर कसे? याची खात्री करावी.