Nashik News : 'वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर', अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉइज टाऊन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले. 


दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.


एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली' या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी बॉईज टाऊन मध्ये अवतरले. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. 
               
ईश्वर काळे व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी,  ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण बॉईज टाऊन शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले. विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवद्ध्वज  घेऊनअभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत ह्या सोहळ्याचा शेवट झाला.
            
बॉईज टाउनची 13 वर्षाची परंपरा 
गेल्या तेरा वर्षांपासून बॉईज टाऊनच्या माध्यमातून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. मध्यंतरी कोरोना काळातही या रिगन सोहळ्यास खंड पडू दिला नाही. या दोन वर्षी ई दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते, त्या त्या वेळी पाऊसाने आम्हाला साथ दिली आहे. म्हणून आम्ही शाळेत पंढरपूर उभं करू शकलो. यंदाचा हा रिंगण सोहळा आनंददायी ठरला असून सर्व शाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे प्राचार्या स्वामींनी वाघ यांनी सांगितले.  


शाळा हेच पंढरपूर 
तब्बल दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाला. राज्याच्या कानाकोप-यातून लाखोंच्या संखेने भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दक्षिण काशी समजल्या जाणा-या तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. हा वैष्णवांचा मेळा खूप मोठा असून या वारीत मध्ये सर्व साधु-संतांच्या पालख्या येत असतात. अशा विठ्लाचा सोहळा अनेकांना अनुभवता येत नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना पंढरपूर अनुभवण्यासाठी शाळेतच दिंडी सोहळा आयोजित केला जातो.