Nashik News :  मलेशिया येथे होणाऱ्या युथ इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनच्या परिषदेसाठी नाशिकच्या प्रीत बोडके हीची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. 


नाशिकची प्रीत बोडके ही इयत्ता बारावीत शिकते. शालेय जीवनापासून तीने सीबीएसई या पॅटर्नमध्ये शिक्षण घेतले असल्याने सिव्हिल सर्व्हिसेसकडे तिचा कल आहे. या अनुषंगाने शाळेने देखील अनेकदा शालेय वाद विवाद स्पर्धेत प्रीतला सहभागी करून घेत उत्साह वाढविला. अभ्यासात हुशार असल्याने अनेक विषयांत तिचा हातखंडा आहे. याच गुणकौशल्यामुळे तिला मॉडेल युनायटेड नेशनच्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान मलेशिया येथे ही काँफेरन्स होणार आहे. यामध्ये प्रीती ही युके या देशाचे युनिसेफ समितीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणार आहे. जगातील 184 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार असून युवकांच्या समस्या आणि त्यावर समाधान या विषयावर या संमेलनात चर्चा होणार आहे. 


दरम्यान मॉडेल युनायटेड नेशनच्या परिषद ही इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्क (IGN) द्वारे आयोजित केली जाते. ज्यामध्ये व्यवसाय, तांत्रिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यासाठी जगभरातील तरुणांना एकत्र आणले जाते. शिवाय, 'युथ लीडर्स टू द वर्ल्ड' या व्हिजनची अंमलबजावणी करताना प्रत्येक व्यक्तीला जागतिक एक्सपोजरमध्ये सामील होण्याची आणि त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. आशिया युथ इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स ही संस्था तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यांच्या क्षमता, विकास आदींवर भर देऊन संवाद आणि राजनीतीक कौशल्ये सुधारण्यावर भर दिला जातो. 


अशी करतात निवड 
मॉडेल युनायटेड नेशनच्या माध्यमातून दरवर्षी या परिषदेचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यासाठी अर्जप्रक्रिया केली जाते. ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर दहा मिनिटांची चाचणी घेतली जाते. एक विषय देऊन आपल्याकडून निबंध लिहून घेतला जातो. यानंतर मेलच्या साहाय्याने ते आपल्या निवडीबाबत माहिती देतात. मात्र हा अर्ज करण्यासाठी आपले शिक्षण सीबीएसई पॅटर्न मधून झालेले आवश्यक असते. 


खूप आनंद झाला. 
माझं शिक्षण सीबीएसई पॅटर्न मधून झालेले आहे. त्यामुळे अनेकदा सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करताना परदेशातील परिषदांची माहिती मिळत असते. मॉडेल युनायटेड नेशनच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात मैत्रिणीने सांगितले. मैत्रीण अर्ज करत असल्याने मी अर्ज केला. मात्र निवड झाल्यावर मला विश्वासच बसला नाही. मला व घरच्यांनाही या निवडीचा खूप आनंद झाला. 


काय आहे मॉडेल मॉडेल युनायटेड नेशन
एशिया युथ इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स (AYIMUN) विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. यात नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, टीम वर्क आदींची जबाबदारी शिकवली जाते. विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपल्या सुप्त गुंणाची माहिती होईल. या गुणांच्या आधारे ते मॉडेल युनायटेडचे विषय समाजापर्यंत पोहचवतील. यासाठी एशिया युथ इंटरनॅशनलचे उद्दिष्ट आहे कि, जगभरातील युवकांचे नेतृत्व गुण विकसित करणे आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.