Nashik Earthquake : राज्यभरात केवळ 7 ते 8 ठिकाणी असलेल्या भूकंप मापन यंत्र (Seismic measuring device) सुस्थितीत आहेत. बाकी सर्व ठिकाणची यंत्र बंद असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यातही नाशिक (Nashik) सारख्या ठिकाणच्या केंद्रातील विद्युत पुरवठा (Power Supply) चार दिवस बिल न भरल्यानं खंडित होता. त्यामुळे सरकारी पातळीवरील अनास्था समोर आली आहे. वीज बिल (Light Bill) थकल्याने नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे भूकंप मापन केंद्राचा विद्युत पुरवठा पाच दिवस खंडित झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
भूकंप मापन केंद्रासह राज्यातील धरणाचं गाळ सर्व्हेक्षण, अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन, स्टील, सिमेंट टेस्टिंग माती परीक्षण केंद्र असे महत्वाचे विभाग जलसंपदा खात्याच्या अखत्यारीत ह्या केंद्रात केले जातात. मात्र दोन तीन महिन्यांचे साडेतीन लाख रुपयांचे बिल थकविल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्याची नामुष्की या अति महत्वाचा विभागावर ओढवली होती. शुक्रवारी सायंकाळी खंडित झालेला विद्युत पुरवठा मंगळवारी सायंकाळी सुरू झाला. सुदैवाने इन्व्हर्टरने साथ दिल्याने डिजिटल भूकंप मापन यंत्र सुरू होते. मात्र अनलॉगचा बॅकअप संपल्याने त्यानेही साथ सोडली होती.
भूकंपाची अचूक नोंद करण्यासाठी राज्यभरात डिजिटल भूकंप मापन यंत्र बसविले जाणार आहेत. राज्य सरकारच्या तीन महिन्या पूर्वीच्या आदेशानुसार लवकरात लवकर डिजिटल लायझेशन करण्याच्या सूचना आहेत. सद्यस्थितीत राज्यभरात जुन्या अनलॉग मशीनच्या साह्याने भूकंपाची नोंद होते मात्र हे सर्व जुने मशीन बंद पडत चालले असून त्याचे स्पेअर पार्ट ही मिळत नाही. राज्यभरात एकूण 30 पैकी केवळ नाशिक, कोयना, सातारा, कोल्हापूर, वारणा आशा 8 ठिकाणची जुने मशीन कार्यान्वित असून इतर ठिकाणचे मशीन नादुरुस्त असल्याने भूकंपाची नोंद घेतली जात नाही,
धरणाच्या क्षेत्रात प्रमुख्याने भूकंप मापन केंद्र सुरू केले जातात. सुदैवाने नाशिक, कोयना, वारणा सारख्या ठिकाणचे केंद्र सध्यातरी सुरू आहेत. एवढीच काय ती दिलासा देणारी बाब, मात्र ज्या खात्यासाठी लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, ज्यावर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अवलंबून असतो. अशा विभागाचा विद्युत पुरवठा 5/5 दिवस बंद राहतो. तिथले कामकाज ठप्प होते, ही सरकारी अनास्था दूर होण्याची आवश्यकता आहे.
आता भूकंप मापनासाठी डिजिटल मशीन
नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan), दिंडोरी (Dindori) तालुक्यात मागील आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र त्याचे केंद्र अद्यापही समजू शकलेलं नाही, एखाद्या भूकंपाचे केंद्र अचूक शोधण्यासाठी तीन भूकंप मापन केंद्रात नोंद होऊन त्याचा अहवाल आवश्यक असतो, मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्याप केंद्र सापडू शकलेलं नाही. राज्यातील भूकंप मापन यंत्र बंदच असल्याने राज्याच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले तर अशाच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. डिजिटल मशीन बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी संथ गतीने कारभार सुरू आहे. सध्या नाशिक आणि नांदेड मध्ये डिजिटल मशीन (Digital Machine) बसविण्यात आले असून इतर केंद्रांना प्रतीक्षा असल्याची माहिती नाशिकच्या भूकंपआघात सामग्री आणि पृथक्करण कक्षाच्या अभियंता चारुलता चौधरी यांनी केले आहे.