Nashik Sinner Accident : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) महोदरी घाटात आणि नायगाव रोडवर मापरवाडी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात (Major Accident) तीन जण ठार झाले आहे. महोदरी घाटातील (Mahodari Ghat) अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यांत अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढत असून सध्या पावसाचे (Rain) दिवस असल्याने अपघात अधिकाधिक होत आहेत. नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या मोहदरी घाटात पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरु झाली आहे. एकाच दिवशी दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा मोहदरी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी सव्वा आठ वाजता नाशिकहून सिन्नरकडे (Sinner) येताना मोहदरी घाटात खाजगी जीप वळणावर पुढील वाहन धडकली. या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे तर दुसऱ्या एका अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात विना नंबर प्लेट असलेली मॅक्स सवारी हे खाजगी प्रवासी वाहन नाशिकहून सिन्नरकडे येत होते. मोहदरी घाट चढताना सुरुवातीच्याच वळणावर ओव्हरटेक करताना प्रवासी वाहनाने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. यामुळे वाहनाची पुढील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात शारदा मोरे या महिलेचा डोक्याला गंभीर मार लागल्याचे तिचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात संतोष गडाख, मनीषा मुकेश सावंत, ललिता प्रभाकर जाधव, पुष्पा प्रदीप खंडारे, शोभा कैलास शिंदे या पाच जणांना गंभीर दुखापत झाली. तर अपघातानंतर सदर जीपचा चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले. अपघातानंतर महामार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांनी महामार्ग पोलीस व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिका चालक गंगेस गणेश काकड यांनी जखमींना स्थानिकांच्या मदतीने सिन्नर मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले
तर दुसऱ्या घटनेत सकाळच्या सुमारास पल्सर दुचाकीने दोन तरुण माळेगाव एमआयडीसीतून नायगाव रोडने सिन्नरकडे येत होते. मापारवाडी शिवारात ते आले असता समोरुन येणारी मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयाची बस त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरुन रस्त्यावर पडल्याने ज्ञानेश्वर राजेंद्र भारस्कर व अनिकेत नंदू खताळे या दोन्ही तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी सिन्नर पोलिस व रुग्णवाहिकेला याबाबत माहिती दिली. स्थानिकांनी मदत करत दोघांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रामदास धुमाळ करत आहेत. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
सिन्नर घाटात अपघातांची मालिका
सिन्नरच्या मोहदरी घाटात सातत्याने अपघात प[होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे दुचाकी घसरणे, अपघात होणे नित्याचे झाले आहे. परिणामी हा रस्ता वर्दळीचा असल्याने अपघातांची संख्याही अधिक आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ याबाबत पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येते.