नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच येथील नाविन्यपूर्ण अध्यासन केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी प्राधान्य असेल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे तर मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले.
आगामी काळातील नाशिकचा शैक्षणिक विस्तार व शिक्षणाच्या रुंदावलेल्या कक्षा लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सक्षमीकरण करून येथे विद्यापीठाचा 'नाशिक कॅम्पस' सुरु करण्याचा 24 जून 2013 रोजी निर्णय घेतलेला होता. विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यावेळी उच्च-शिक्षण मंत्री होते. 2014 साली या उपकेंद्रासाठी मौजे शिवनई येथील 62 एकर जागा निश्चित करण्यात आली होती. पण नंतरच्या पाच वर्षात या उपकेंद्राचे काम रखडले. आज अखेर कॅम्पसचा भूमीपुजन सोहळा पार पडला.
नाशिकला एज्युकेशन हब बनवायचं!
नाशिकमध्ये एज्युकेशन हब निर्माण व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी नाशिक मध्ये होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे. युजीसी व एआयसीटीईच्या माध्यमातून विविध शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करून मोफत शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच शहराची वाढती शैक्षणिक गरज लक्षात घेऊन केंद्रीय विद्यालयांची निर्मिती. तसेच केंद्र शासनाच्या व्यवसायाभिमुख केंद्रीय महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करून येथे तज्ज्ञ शिक्षक, ऑडीओ व्हिज्युअल वर्ग, सुसज्ज वाचनालये निर्माण करण्यात येऊन ‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन भुजबळ यांनी केले.
सावित्रीबाईंचे विचार तळागाळापर्यंत...
ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालवले जात आहे. त्या सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहचवायचे असतील तर त्याचा एकमेव मार्ग हा शिक्षण असल्याचे सांगत जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्याला घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मजबुतीने उभे रहावे. देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.