Nashik NMC Election : राज्यातील मनपा निवडणुकांच्या (Mahapalika Election) प्रारूप मतदार याद्या (Voter List) प्रसिद्ध झाल्यापासून हरकती मागविण्यात आल्या होत्या. नाशिक मनपा निवडणूक (Nashik NMC Election) मतदार याद्यांवर तर हरकतीचा पाऊस पडला. राज्यातील हरकतीच्या बाबतीत नाशिक (Nashik) तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे दिसून आले. यामुळे आता अंतिम मतदार यादी हि 09 जुलै ऐवजी 16 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक महापालिकेला तब्बल 3847 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील इतर काही महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाले आहे तर मुंबईसह भागात काही जोरदार पाऊस सुरू आहे. आगामी काळात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता 9 ऐवजी 16 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. याबाबतचे आदेश नाशिक महापालिकेला प्राप्त झाले आहे.


नाशिक महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. यानंतर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती आल्या. शिवाय अनेक प्रभागातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांसोबत मतदार यादी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेतली हाेती. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन मतदार यादी तयार करण्याच्या सुधारीत कार्यक्रमानुसार 14 महानगरपालिकांची अंतिम मतदार यादी 09 जुलै रोजी प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु या महानगरपालिकांकडे प्राप्त झालेल्या हरकतींची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे. असे आयोगाच्या निर्दशनास आले आहे. 



पावसामुळे व्यत्यय 
दरम्यान 14 महानगरपालिकांपैकी बृहन्मुंबई, वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई व कल्याण डोबिंवली या महानगरपालिका मुंबई महानगर विकास प्राधिकरण या क्षेत्रामधील आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस असून भारतीय हवामान खात्याने पुढील 4 दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सुधारीत करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नाशिक महापालिका प्रशासनाला मिळण्याची माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली.


नाशिकमध्ये विक्रमी हरकतीं
नाशिक मनपा निवडणूक मतदार याद्यांवर हरकती दाखल करण्यासाठी 2 दिवसांची मुदतवाढ देत 3 जूलैपर्यंत संधी दिली. या कालावधीत 3874 हरकती दाखल करण्यात आल्या. त्यात सर्वाधीक हरकती सिडकोतील 2433 इतक्या आहेत. खालोखाल पूर्व विभागात 244, पश्‍चिम 46, पंचवटी 396, नाशिकरोड 222, सातपूर 155, तर ट्रू व्होटर्स ॲपवर 352 अशा 7 हरकती दाखल झाल्या आहेत. एवढ्या विक्रमी हरकतींचा निपटारा करून 9 जुलै रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे शक्य नसल्यामुळे पालिकेने निवडणुक आयोगाकडे मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवला होता.